जिल्हा परिषदेचे विखुरलेले विभाग एका छताखाली आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:04 AM2021-07-25T04:04:06+5:302021-07-25T04:04:06+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या नव्या प्रस्तावित इमारतीमुळे सर्व विभाग विखुरले गेले आहेत. त्यात इमारतीची निविदा, कार्यादेश, प्रत्यक्ष बांधकाम याला ...
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या नव्या प्रस्तावित इमारतीमुळे सर्व विभाग विखुरले गेले आहेत. त्यात इमारतीची निविदा, कार्यादेश, प्रत्यक्ष बांधकाम याला अद्याप मुहूर्त न लागल्याने किमान तीन ते पाच वर्षे इमारत पूर्ण होण्यास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विभाग एका छताखाली आणले तरच अभ्यागत, सदस्यांना सोयीचे होईल. तसेच प्रशासनावर वचक राहील, अशी भूमिका जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी मांडली आहे.
पंचायत, पशुसंवर्धन, ग्रामीण विकास यंत्रणा घाटीच्या समोर, नागळीबागेत वित्त विभागाचा काही भाग, तर इतर समाज कल्याण विभाग सामाजिक न्यायभवनात स्थलांतरित झाला, तर काही विभाग दिल्ली गेट, आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात विखुरल्याने नियंत्रण, समन्वय अवघड बनला असल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे, तर सर्व कार्यालये कोणत्याही खर्चाशिवाय स्थलांतरित झाले असल्याने भाड्याने इमारत घेऊन एका छताखाली सर्व विभाग येणे अशक्य असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र, कार्यालये विखुरले गेल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिलेले नाही. अभ्यागतांसह सदस्यांनाही गैरसोयीचे झाल्याचे मत गायकवाड यांच्यासह भाजप सदस्यांकडून व्यक्त केले गेले.