प्रियदर्शनी उद्यानात सापडला ब्रिटीशकालीन खजाना, नाण्यांवर आहे व्हिक्टोरिया राणीचे चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 13:00 IST2021-12-21T13:00:12+5:302021-12-21T13:00:46+5:30
British Era treasures found in Aurangabad नाण्यावर व्हिक्टोरिया राणीचे चित्र असून सन १८५४, १८६१, १८८१ या काळातील ही नाणी आहेत.

प्रियदर्शनी उद्यानात सापडला ब्रिटीशकालीन खजाना, नाण्यांवर आहे व्हिक्टोरिया राणीचे चित्र
औरंगाबाद : एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संरक्षण भिंतीसाठी खोदकाम करताना सोमवारी (दि.२०) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ब्रिटीशकालीन (British Era treasures found in Priyadarshini Park of Aurangabad) दोन किलो नाणी सापडली. ही नाणी महापालिका अधिकारी व कंत्राटदाराने त्वरित पोलिसांकडे सुपुर्द केली. ही नाणी लवकरच तपासणीसाठी राज्य पुरातत्व विभागाकडे सुपुर्द केली जाणार आहेत. ( 2 kg coins depicting Queen Victoria found)
प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन उभारण्याचे काम मनपाने सुरू केले. स्मारकाच्या कामासोबत स्मृतीवनामध्ये देशी व दुर्मीळ प्रजातींची साडेतीन हजार झाडे लावण्यात आलेली आहेत. स्मारकाच्या संरक्षण भिंतीचे काम रत्नगुरू एजन्सीला मिळालेले आहे. स्मारकाच्या पाठीमागील बाजूस संरक्षण भिंतीसाठी जेसीबीने खड्डे खोदून त्यातील माती बाहेर काढत असताना सोमवारी सायंकाळी अचानक नाण्यांचा खळखळाट झाला. आवाज येताच जेसीबी थांबवून पाहणी केली असता एका गाठोड्यामध्ये नाणी सापडली. काही नाणी खड्डयातही आढळली. नाणी सापडताच कंत्राटदार रोहीत स्वामी यांनी वॉर्ड अभियंता व्ही. के. गोरे यांना माहिती दिली. वॉर्ड अभियंता त्वरित तेथे दाखल झाले. त्यांनी ही नाणी पाहिली व त्याचे इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन केले असता नाण्यांचे वजन १ किलो ९५८ ग्रॅम भरले.
सापडलेली नाणी ब्रिटीशकालीन असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. नाण्यावर व्हिक्टोरिया राणीचे चित्र असून सन १८५४, १८६१, १८८१ या काळातील ही नाणी आहेत. वॉर्ड अभियंता व्ही. के. गोरे व कंत्राटदार यांनी तातडीने सिडको पोलिसांना ही माहिती दिली. राज्य पुरातत्व विभागालादेखील कळविल्याचे गोरे यांनी सांगितले. ब्रिटीशकालीन नाणी सापडल्यामुळे संरक्षण भिंतीचे काम महापालिकेकडून त्वरित थांबविण्यात आले. पोलिसांना पत्र देऊन तेथे बंदोबस्त देण्याची मागणी केली जाणार असून सुरक्षारक्षक नेमण्यात येतील. तसेच राज्य पुरातत्त्व विभागाकडून मार्गदर्शन घेतले जाईल, असे गोरे यांनी सांगितले.