छत्रपती संभाजीनगर बसस्थानकावर इंग्लंडच्या पर्यटकाचे पाकिटे मारले; रोकड, कागदपत्रे लंपास
By सुमित डोळे | Published: May 4, 2024 07:39 PM2024-05-04T19:39:38+5:302024-05-04T19:40:24+5:30
अभ्यास दौऱ्यासाठी खुलताबादला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना झाली चोरी
छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती बसस्थानकावर सातत्याने वावर असलेल्या चोरांचा इंग्लंडच्या तरुण पर्यटकालाही फटका बसला. अभ्यास दौऱ्यासाठी खुलताबादला जाण्यासाठी तरुण बसमध्ये चढत असताना चोराने त्यांच्या खिशातील पाकीट लंपास केले. ज्यामध्ये ५ हजार रुपये रोख, एटीएम कार्ड व ट्रॅव्हल्स कार्ड होते.
काही दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानक व सिडको बसस्थानक परिसरात चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. सातत्याने महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने, पर्स लांबविल्या जात आहेत. त्यातच विदेशी नागरिकालाही या चोरांनी सोडले नाही. मूळ इंग्लंडचे रहिवासी असलेले क्रेग रॉबर्टसन जॉन रॉबर्टसन (३१) हे सध्या भारताच्या अभ्यास दौऱ्यावर आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते दोन दिवसांपासून शहरात विविध पर्यटन स्थळांना भेटी देत हाेते.
शुक्रवारी त्यांचे खुलताबाद व वेरूळला भेट देण्याचे नियोजन होते. त्यासाठी खासगी टॅक्सीऐवजी त्यांनी शासकीय बसद्वारे जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी ८:३० वाजता ते बसमध्ये चढत असतानाच चोराने त्यांच्या पँटच्या खिशातील पैशाचे पाकीट लंपास केले. ही बाब लक्षात आल्यावर ते तत्काळ बसस्थानकावरील पोलिस चौकीत जात माहिती दिली. क्रांती चौक पोलिस ठाण्यात निरीक्षक सुनील माने यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.