लग्नाची साेडली, दुसरीसोबत लिव्ह इन अन् आता निराधार अल्पवयीन मुलगी पळवली
By राम शिनगारे | Published: May 2, 2023 04:16 PM2023-05-02T16:16:20+5:302023-05-02T16:16:26+5:30
पोलिसांनी तीन बायकांच्या दादल्यास ठोकल्या बेड्या; 'एएचटीयू' पथकाची कारवाई
छत्रपती संभाजीनगर : लग्न केलेली बायको चार मुलांसह सोडून दिली. त्यानंतर एकीसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. तिच्यापासून एक मुलगी झाली. ते कमी म्हणून की काय त्याने अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून २१ सप्टेंबर २०२१ रोजी पळवले. तिलाही याच्यापासून एक मुलगा झाला. शेवटी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) फरार आरोपीस बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक शिवाजी तावरे यांनी दिली.
सुभाष फकिरा राठोड (४१, मुळ रा. पोकरणी, ता. गंगाखेड, जि. परभणी, ह.मु. इंदीरानगर) असे आरोपीचे नाव आहे. येत्या ५ मे रोजी १८ वर्ष पूर्ण होत असलेल्या अल्पवयीन मुलीस सुभाष राठोडने २१ सप्टेंबर २०२१ रोजी पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या आजीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला. गुन्ह्याचा तपास १६ जुन २०२२ रोजी 'एएचटीयू'कडे सोपविला. या पथकाने बारकाईने तपास करीत मुलीचा शोध घेत राठोड यास बेड्या ठोकल्या. मुलीला पळविले तेव्हा तिचे वय १६ वर्ष होते.
मुलीसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित करीत राठोड यांच्यापासून तिला मुलगा झाला. सध्या तो पाच महिन्यांचा आहे. मुलीचा शोध लागल्यानंतर तिला पुंडलिकनगर पोलिसांकडे सोपविले आहे. ही कारवाई निरीक्षक शिवाजी तावरे, सहायक निरीक्षक सुषमा पवार, सहायक फाैजदार इसाक पठाण, हवालदार डी.डी. खरे, संतोष त्रिभूवन, अमृता काबलिये, हिरा चिंचोळकर, सोनाली वडनेरे यांच्या पथकाने केली.