पायी चालण्याची मोडली सवय, नको त्या वयात गुडघे, कंबरदुखी..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:02 AM2021-09-26T04:02:01+5:302021-09-26T04:02:01+5:30
वजन वाढीला हातभार : आजार उद्भवल्यानंतर व्यायामापुरते होते चालणे सुरु संतोष हिरेमठ औरंगाबाद : धावपळीच्या युगात वाहनांचा वापर वाढला ...
वजन वाढीला हातभार : आजार उद्भवल्यानंतर व्यायामापुरते होते चालणे सुरु
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : धावपळीच्या युगात वाहनांचा वापर वाढला आहे. अगदी थोड्याही अंतरावर जाण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहन नेले जाते. त्यामुळे अनेकांची चालण्याची सवयच मोडली आहे. परिणामी, नको त्या वयात कंबर, गुडघे आणि पाठदुखी मागे लागत आहे. तेव्हा कुठे मगं व्यायामापुरते का होईना अनेक जण चालणे सुरु करतात. त्यामुळे सध्या व्यायामापुरते अनेकांचे चालणे उरल्याची स्थिती पहायला मिळते आहे.
पायी चालण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु स्पर्धेच्या युगात प्रत्येक ठिकाणी कमीत कमी वेळेत पोहोचण्यावर भर दिला जातो. त्यामुळे कुठेही जायचे म्हटले की वाहन, अशी स्थिती सध्या पहायला मिळते. घरातून नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी वाहनाने जायचे आणि पुन्हा वाहनाने घरी परतायचे, असा अनेकांचा दिनक्रम ठरलेला आहे. घरातील ज्येष्ठ मंडळी वाहनांचा वापर टाळतात. परंतु वयोमानामुळे त्यांनाही चालणे कठी होते. तेही व्यायामापुरते घराबाहेर पडतात. गेल्या १७ महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावाला सामोरे जावे लागत आहे. लाॅकडाऊन, वर्क फ्राॅम होम, या गोष्टींना सामोरे जावे लागले. त्यामुळे चालण्याचे प्रमाण आणखी कमी झाले. पायी चालण्याचे प्रमाण कमी झाल्याने गुडघे, कंबरदुखी वाढीला हातभार लागत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
-------
या कारणांसाठीच होतेय चालणे
ज्येष्ठ -व्यायाम म्हणून सकाळ आणि संध्याकाळ पायी चालणे.
महिला - किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षा मिळेपर्यंत.
पुरुष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केली तर शतपावली.
तरूणाई -गल्लीतील मित्र-मैत्रिणीच्या घरापर्यंत.
------
...म्हणून वाढले हाडांचे आजार
घाटी रुग्णालयातील अस्थीव्यंगोपचार विभागप्रमुख डाॅ. एम. बी. लिंगायत म्हणाले, नियमितपणे चालण्यामुळे हाडे मजबूत होतात. सकाळी कोवळे ऊन असते. अशा कोवळ्या उन्हातून व्हिटॅमिन डी मिळते. त्यातूनही हाडे मजबूत होतात. चालणे अभावी स्थूलता वाढण्यास हातभार लागतो. वजन वाढले की गुडघे आणि पाठीचे आजार उद्भवण्याची शक्यता वाढते.
-----
हे करून पाहा
एक किमी परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा.
कुठलेही काम करताना सहकाऱ्यांची मदत कमीत कमी घ्या.
घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा.
जवळच्या अंतरासाठी पायी जावे अथवा सायकलचा वापर करावा.
------
ज्यांना पायी चालणे शक्यच नाही, त्यांच्यासाठी...
ज्येष्ठ आणि आजारी व्यक्तींसह ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांनी बसल्या जागी शक्य तेवढ्या प्रमाणात पायाचे, पाठीचे आणि इतर व्यायाम केले पाहिजे. योगासने, प्राणायाम करण्यास प्राधान्य दिला पाहिजे. कोणताही व्यायाम सुरु करताना एकदम जोरात हालचाली करण्याऐवजी हळूहळू सुरुवात करून वेग वाढविला पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले.