तहसीलमध्ये झाले दलालच कारभारी !
By Admin | Published: August 11, 2014 12:06 AM2014-08-11T00:06:46+5:302014-08-11T00:17:42+5:30
बीड: दिवसेंदिवस जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तहसील कार्यालय परिसरात दलालांचा सुळसुळाट वाढतच आहे.
बीड: दिवसेंदिवस जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तहसील कार्यालय परिसरात दलालांचा सुळसुळाट वाढतच आहे. यामध्ये वडवणी, केज, धारुर अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. दलालांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत.
सध्या शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शिष्यवृत्ती फॉर्मसाठी लागणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी आपल्या तहसील कार्यालयात गर्दी करताना दिसून येत आहेत. प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र येथील अधिकारी, कर्मचारी थेट दलालांकडे पाठवून त्यांच्यामार्फत स्वत:ची झोळी भरुन घेत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. तसेच ओळखीचे लोक पाहून त्यांना तात्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले जात आहेत तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ८ ते १५ दिवस ‘वेटींग’ वर रहावे लागत आहे. विशेष म्हणजे नियमापेक्षा अधिक पैसे घेऊन शेतकरी, विद्यार्थी, पालक यांची आर्थिक लूट केली जात आहे.
या दलालांना वरिष्ठांचे अभय असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. धारुर, केज, वडवणी या तहसील कार्यालयामध्ये तर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हद्दपार केल्याचे दिसून येत आहे.
वडवणीच्या ‘सेतू’ मध्ये दलालच हाकतात कारभार
येथील सेतू कार्यालयात दलालांचाच कारभार चालतो. यांच्या आदेशानंतरच सेतूमधील कर्मचारी विद्यार्थी, शेतकरी यांना कागदपत्रे देतात. सेतूमधील कर्मचारीही विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे सेतूमधील महत्वाची कागदपत्रे खाली-वर करण्याचा महाप्रतापही येथील दलाल करीत असतात, याकडे मात्र तहसीलदारांचे दुर्लक्ष असते. या दलालांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.
धारुरमध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूक
सध्या शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी लागणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी हे दलाल विद्यार्थ्यांकडून १०० ते १५० रुपये घेत आहेत. एवढी रक्कम मोजूनही वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे. येथील कारभारही दलालांच्याच म्हणण्याप्रमाणेच चालतो, असे येथील शेतकऱ्यांमधून ऐकावयास मिळाले.
केजमध्ये सर्वसामान्यांना
अरेरावीची भाषा
केजमध्ये विविध कागदपत्रे काढण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना येथील दलाल अरेरावीची भाषा वापरतात. मुद्रांकही वाढीव दराने घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
याबाबत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले पाहणी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. सर्वसामान्यांचे हाल होणार नाहीत, याची दक्षता घेऊ, असे ते म्हणाले. (वार्ताहर)