औरंगाबाद महापालिकेच्या चार विभागांमध्ये दलाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:32 PM2018-09-26T23:32:40+5:302018-09-26T23:34:05+5:30
औरंगाबाद : महापालिकेत समस्या घेऊन सर्वसामान्य नागरिक कमी आणि दलाल जास्त येतात, असे विधान आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ...
औरंगाबाद : महापालिकेत समस्या घेऊन सर्वसामान्य नागरिक कमी आणि दलाल जास्त येतात, असे विधान आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी केले. या विधानावरून एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी महापौरांनी दलालीच्या मुद्यावर सारवासारव करीत अनवधानाने आयुक्त बोलले असतील असे नमूद केले. ‘लोकमत’ने दलालीच्या मुद्यावर काही विभागांमध्ये चाचपणी केली असता आयुक्त १०० टक्के खरे बोलल्याचे दिसून आले. महापालिकेच्या चार विभागांमध्ये दलालांशिवाय पानही हलत नाही, हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही.
नगररचना विभाग
बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, गुंठेवारी आदी कामांसाठी सर्वसामान्य नागरिक अक्षरश: उंबरठे झिजवतात. मात्र, त्यांची कामे होत नाहीत. कारण त्यांनी दलालांमार्फत फाईल दाखल केलेली नसते. थेट फाईल दाखल केली असल्यास नंतर दलालांची मदत घेतलेली नसते. ज्यांना या विभागाची परंपरा माहीत आहे, त्या बांधकाम व्यावसायिकांची फाईल अजिबात कुठेच थांबत नाही. सध्या या विभागात ८०० फायलींचा डोंगर साचला आहे. कोणत्या अधिकाऱ्याकडे किती फायली प्रलंबित आहेत याचा हिशेबच नाही. ज्या मालमत्ताधारकांनी दलालांमार्फत ‘इच्छा’तीच फाईल बाहेर निघते. एखाद्याने खूपच राग, रोष व्यक्त केल्यास त्याच्या फाईलमध्ये एवढ्या त्रुटी काढण्यात येतात की, आयुष्यभर तो त्रुटींची पूर्तता करू शकत नाही.
अतिक्रमण विभाग
या विभागात बोटावर मोजण्याऐवढेच चमत्कारिक अधिकारी व कर्मचारी आहेत. या विभागात दरवर्षी सुमारे १५०० तक्रारी प्राप्त होतात. त्यातील फक्त ५० ठिकाणीच कारवाई होते. कारवाई करण्यासाठी यांची ‘मर्जी’ सांभाळावी लागते. ज्या व्यक्तीच्या मालमत्तेसंदर्भात कारवाई होणार आहे, त्याला जास्त नुकसान होऊ देणार नाही म्हणून ही मंडळी अलगदपणे आपला वाटा काढून घेतात. या सर्व व्यवहारासाठी दलालांची भूमिका सर्वात मोठी ठरते. माहिती अधिकारात माहिती मिळवून तक्रार देण्यासाठी या विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी वॉर्डनिहाय दलाल नेमून ठेवले आहेत. दिवसभरात एवढी ‘माया’ आपण सोबत नेली पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व जण काम करतात.
मालमत्ता विभाग
महापालिकेसाठी सोन्याची अंडी देणारा हा विभाग होय. मात्र, मागील काही वर्षांमध्ये या विभागातही प्रचंड दलाली वाढली आहे. महापालिकेच्या जागा परस्पर ३० वर्षांसाठी भाडेकरारावर देणे, महापालिकेच्या दुकानांमधील भाडेकरूंकडून वसुली करणे, पण मनपात जमा न करणे, होर्डिंग व्यवसायात मनपाच्या तिजोरीत कमी आणि आपल्या खिशात जास्त महसूल कसा जाईल यादृष्टीने सर्वदूर प्रयत्न सुरू असतात. पार्किंग, बाजार आदी ठिकाणी वसुलीसाठी दलालच नेमून ठेवले आहेत.
वॉर्ड कार्यालये
शहरात महापालिकेचे नऊ वॉर्ड कार्यालये आहेत. प्रत्येक वॉर्ड कार्यालयात कामाच्या स्वरुपानुसार दलाल मंडळी नेमलेले आहेत. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रापासून नवीन कर लावून देणे, जुनी थकबाकी असेल तर त्यात मार्ग काढून देणे, अनधिकृत नळ, साफसफाई आदी प्रत्येक ठिकाणी दलालांचा सुळसुळाट झालेला आहे. दलालांशिवाय येथेही पान हलत नाही. वॉर्ड अधिकारी, वॉर्ड अभियंत्यांना ही बाब माहीत नाही, असे नाही. उलट या मंडळींमुळेच अधिकारी व कर्मचाºयांचा खडतर ‘मार्ग’ अधिक सोपा होतो.