‘आरटीओ’त दलालांची चांदी सुरूच, लर्निंग लायसन्ससाठी १५० रुपये जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 12:45 PM2022-05-03T12:45:17+5:302022-05-03T12:50:01+5:30
कार्यालयातील सर्वच कामे ऑनलाईन झाली आहेत; परंतु दलालांचा विळखा कायम आहे.
औरंगाबाद : ऑनलाईन शाॅपिंग केली जाते, ऑनलाईनवर खाद्यपदार्थांची ऑर्डरही दिली जाते; परंतु अजूनही वाहनधारक आरटीओ कार्यालयातील कामकाज स्वत: ऑनलाईन करीत नसल्याची परिस्थिती आहे. कोणी वेळ नाही म्हणून, तर कोणी ऑनलाईन अर्ज भरण्याची आणि आरटीओ कार्यालयात चकरा मारण्याची कटकट नको म्हणून सरळ दलालांचा रस्ता धरतात. अशांकडून दलाल मंडळी चांगलीच रक्कम उकळतात. लर्निंग लायसन्ससाठी शासकीय शुल्काच्या तुलनेत १५० रुपये अधिक दलालांकडून आकारले जात असल्याचे रिॲलिटी चेकमधून समोर आले.
राज्यातील पहिले ऑनलाईन कार्यालय म्हणून औरंगाबाद आरटीओ कार्यालयाची ओळख आहे. कार्यालयातील सर्वच कामे ऑनलाईन झाली आहेत; परंतु दलालांचा विळखा कायम आहे. स्वत:हून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया करण्यापेक्षा दलालांना पैसे देऊन मोकळे झालेले बरे, असे म्हणत रोज अनेक वाहनधारक दलालांना गाठतात. लर्निंग लायसन्स असो की पर्मनंट लायन्सस अथवा वाहनासंबंधी इतर कामांसाठी; दलालांनी सांगितलेली रक्कम थोडी कमी करायची आणि कामे करून घ्यायची, असा प्रकार सुरू आहे.
शासकीय दर आणि दलालांचे दर
कामकाज- शासकीय दर-दलालांचे दर
लर्निंग लायसन्स-३५१-५००
पर्मनंट लायसन्स-७६४-१८०० ते २०००
वाहन ट्रान्स्फर-५५०-१२०० ते १५००
आरटीओतील एकूण कर्मचारी-१४९
दलालांची संख्या ३०० पेक्षा जास्त
आरटीओ कार्यालयातील दलालांची संख्या ३०० पेक्षा जास्त आहे. कोणत्याही गुंतवणुकीशिवाय हे काम करता येत असल्याने अनेक तरुण या कामाकडे वळले आहेत. कार्यालयाच्या परिसरात लॅपटाॅपवर कामे करताना अनेक जण दिसतात.
काय आणि कधी पाहिजे ते सांगा ?
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या परिसरात एका चारचाकीत बसून असलेल्या दलालाला विचारणा केली. तेव्हा लर्निंग आणि पर्मनंट असे दोन्ही लायसन्ससाठी एकत्रित २५०० रु. सांगण्यात आले. लर्निंग लायसन्स १५ मिनिटांत मिळून जाईल आणि पर्मनंट लायसन्ससाठी महिनाभरानंतर चाचणी द्यावी लागेल, असे दलालाने सांगितले. त्यावर केवळ लर्निंग लायसन्ससाठी किती पैसे लागतील, असे विचारता ५०० रु. सांगितले.
सर्व कामे ऑनलाईन, एजंटांकडे जाण्याची गरज नाही
आरटीओ कार्यालयातील सर्व कामे ऑनलाईन होतात. त्यासाठी एजंटांकडे जाण्याची गरज नाही. ऑनलाईन शाॅपिंग केली जाते. त्याचप्रमाणे वाहनासंबंधी कामेही ऑनलाईन सहजपणे करता येतात.
- संजय मेत्रेवार, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी