अपघाताच्या भरपाईवरही दलालांचा डाेळा; मृतांच्या नातेवाइकांना मिळणाऱ्या रकमेवरच ‘डल्ला’

By संतोष हिरेमठ | Published: January 10, 2024 12:22 PM2024-01-10T12:22:04+5:302024-01-10T12:22:44+5:30

ठराविक काही जणांकडे ‘क्लेम’ची प्रकरणे सर्वाधिक का? वाचा नक्की प्रकरण काय?

Brokers deal with accident compensation for amount received by the relatives of the deceased | अपघाताच्या भरपाईवरही दलालांचा डाेळा; मृतांच्या नातेवाइकांना मिळणाऱ्या रकमेवरच ‘डल्ला’

अपघाताच्या भरपाईवरही दलालांचा डाेळा; मृतांच्या नातेवाइकांना मिळणाऱ्या रकमेवरच ‘डल्ला’

संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरसह राज्यभर अपघाताच्या ‘क्लेमचा गेम’ सुरू आहे. अपघातात मयत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना क्लेमची ७० ते ८० टक्केच रक्कम दिली जाते. उर्वरित क्लेमच्या रकमेवर अनेकजण डल्ला मारतात. राज्यातील अपघाताच्या केस थेट कर्नाटकातही देण्याचाही प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

‘अपघाताची केस आम्हालाच द्या, चांगला क्लेम मिळवून देऊ. तुम्हाला काहीही खर्च येणार नाही. फक्त क्लेममध्ये १० ते १५ टक्के आमचे...’ असे ‘दुकान’ मांडण्याचा उद्योग घाटीतील शवविच्छेदनगृह परिसरात सुरू आहे.

यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारी रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्तानंतर अनेक ठिकाणी असाच प्रकार सुरू असल्याचे सांगत अनेकांनी ‘लोकमत’कडे कैफियत मांडली. रुग्णालयासह तपास करणाऱ्या यंत्रणेतील अनेकांचा ‘क्लेम’मध्ये सहभाग असून, आर्थिक पिळवणूक होत असल्याचे सांगण्यात आले.

शवविच्छेदनगृह परिसरातच तत्काळ रक्कम

अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना काही एजंट शवविच्छेदनगृहाच्या परिसरातच एक ते दीड लाख रुपयांची रक्कम मदत म्हणून देतात. त्यातून अपघाताची केस त्या एजंटला मिळण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे सांगण्यात आले.

काही जणांकडे ‘क्लेम’ची प्रकरणे सर्वाधिक का?

क्लेमची प्रकरणे काही मोजक्या लोकांकडेच सर्वाधिक का आहेत, याचा शोध यंत्रणेने घेण्याची गरज आहे, असे सांगण्यात आले. क्लेमची रक्कम जास्तीत जास्त मिळण्यासाठी कागदोपत्री गैरप्रकारही केले जात असल्याचे सांगण्यात आले.

अपघात होताच माहिती पुरविणारे कामाला लागतात. राज्यभर हा प्रकार  सध्या माेठ्या प्रमाणात सुरू आहे. बार्शी तालुक्यात एक अपघात प्रकरण कर्नाटक राज्यामध्ये विजयपूर कोर्टातील वकिलांकडे देऊ, तेथे पैसे जास्त मिळतात, अशा भूलथापा देण्यात आल्या. शेवटी ते प्रकरण विजयपूर कोर्टात  देण्यास भाग पाडलेच. असा प्रकार सर्रास सुरूच आहे.
- ॲड. एस. एस. रितापुरे, धाराशिव.

Web Title: Brokers deal with accident compensation for amount received by the relatives of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.