‘भाऊ मोटरसायकल सोडून दुसरं काहीही बोला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:05 AM2021-02-27T04:05:41+5:302021-02-27T04:05:41+5:30
रघुनाथ सावळे उंडणगाव : सध्या पेट्रोल, डिझेलचे दर गगणाला भिडले आहेत. पेट्रोलने तर शंभरी गाठली आहे. याचा परिणाम आता ...
रघुनाथ सावळे
उंडणगाव : सध्या पेट्रोल, डिझेलचे दर गगणाला भिडले आहेत. पेट्रोलने तर शंभरी गाठली आहे. याचा परिणाम आता सगळीकडे दिसू लागला असून, ग्रामीण भागात तर दहा मिनिटांसाठी गाडी मागितली तरी मित्र मित्रालाही ‘भाऊ मोटरसायकल सोडून दुसरं काहीही बोल’ असे म्हणून कटवत आहेत. यामुळे गावांतील एकमेकांमध्ये कटूपणा आणण्यात पेट्रोल, डिझेलचे दर कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे.
सध्या पेट्रोलने शंभरी गाठली आहे. उंडणगावात पेट्रोलचे भाव ९८ रुपये ६७ पैसे इतके आहे. त्यामुळे नागरिक आपल्या मोटारसायकलमध्ये किमान पन्नास रुपयाचे पेट्रोल टाकून चालवित आहेत. सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडल्यामुळे कमी मायलेजवाल्या गाड्या वापरणे परवडत नसल्याने त्या उभ्याच दिसत आहेत. तर बरेच जण हे काटकसर करून गाडीमध्ये पेट्रोल टाकून वापरत आहेत, तसेच अनावश्यक ठिकाणी जाणेही वाहनधारक टाळत आहेत.
पूर्वी पेट्रोलचे कमी भाव असल्यामुळे कोणीही कोणाला मोटारसायकल देत असत; मात्र सध्या भाव वाढल्यामुळे दुसऱ्यांना गाड्या देणे टाळले जात आहे. राग आला तरी चालेल, मात्र गाडी मागू नका, असे स्पष्टपणे बोलताना लोक आढळत आहेत.
चौकट
पेट्रोल टाकत असेल, तर घेऊन जा
ग्रामीण भागात माझी गाडी घेऊन जा, असे मित्रांना म्हणणारे आता पेट्रोल दरवाढीमुळे गाडी देण्यास नकार देत आहेत. काही ठिकाणी संबंध दुरावू नये, यासाठीही काही जण शक्कल लढवित असून, पेट्रोल टाकत असेल तर मोटरसायकल घेऊन जा, असा प्रेमळ सल्ला देत आहेत. तर काही जण गाडीत पेट्रोलचा थेंबही नसल्याचे कारण सांगत आहेत.