बहिणीला भेटायला आलेल्या भावाचा वीज कोसळून मृत्यू;छत्रपती संभाजीनगरास अवकाळीचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 02:45 PM2023-04-08T14:45:13+5:302023-04-08T14:48:29+5:30
अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, पैठण, कन्नड या तालुक्यांत शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे काही घरे, तसेच गुरांच्या गोठ्यावरील टिनपत्रे उडाली. शेतात उभे असलेल्या गहू, सूर्यफूल, मका, बाजरी, कांदा, कांदा बीजोत्पादन या पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा तांडा येथे बहिणीला भेटायला आलेल्या अंबादास भिका राठोड (वय २७, रा. वरसाडा तांडा, ता. पाचोरा, जि. जळगाव) या तरुणाचा वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झाला. तर सिल्लोड तालुक्यातीलच वसई व सिरसाळा येथे वीज पडून पाच गायी दगावल्या.
सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
सिल्लोड तालुक्यातील आठ महसूल मंडळांत शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सिरसाळा तांडा परिसरात वीज पडून एक तरुण व दोन गायी तर वसई शिवारात तीन गायी ठार झाल्या. या पावसामुळे शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले. तर डोंगरगाव येथील एका हॉटेलवर निलगिरीचे झाड कोसळून नुकसान झाले.
सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यासह परिसरातील भायगाव, वरखेडी, बाभूळगाव बु. निल्लोड, भवन आदी गावांमध्ये शुक्रवारी (दि.७) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे लग्न संमारंभाच्या वऱ्हाडाची चांगलीच धांदल उडाली. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या नुकसानीचा लवकरात लवकर पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सोयगाव तालुक्यात वीज पडून चार जखमी
सोयगाव तालुक्यातील वरखेडी तांडा येथे शेतात झाडाखाली उभे असलेले चौघे जण वीज कोसळून गंभीर जखमी झाले. अमरसिंग तुळशीराम जाधव (वय ३७), सुरेश बळीराम राठोड (वय २८), गौरव सुरेश राठोड (वय १२), आश्विन शिवलाल राठोड अशी जखमींची नावे आहेत. वरखेडी तांडा येथे वरील चौघे जण शुक्रवारी शेतात काम करण्यासाठी गेले होते. दुपारी ३ वाजेदरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी चौघे जण झाडाच्या आडोशाला उभे राहिले. तेव्हा अचानक वीज पडून चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी जळगाव येथे नेण्यात आले. वेताळवाडी शिवारात एक बकरी वीज पडून ठार झाली.
कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस
कन्नड : तालुक्यातील नाचनवेल, पिशोर, करंजखेड, चिंचोली लिंबाजी या भागात सायंकाळी एक तास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे शेतात उभी असलेली गहू, सूर्यफुल, मका, कांदा, कांदा बीजोत्पादन या पिकांसह आंब्याला मोठा फटका बसला आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.