गॅरेजच्या सुरक्षारक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; वाळूज महानगर हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 12:18 PM2024-07-08T12:18:48+5:302024-07-08T12:19:32+5:30
खून करुन मारेकरी फरार; घटनास्थळी जाळपोळीचे निशाण आढळून आले
- महमुद शेख
वाळूज महानगर ( छत्रपती संभाजीनगर) : नगररोडवरील बजाज कंपनीसमोर असलेल्या एका गॅरेजवर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची घटना आज सोमवारी (दि.८) सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने वाळूज महानगर हादरले. भाऊसाहेब नामदेव पडुळकर (रा. श्रद्धा कॉलनी, वाळूज) असे मयत सुरक्षारक्षकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी जाळपोळीचे निशाण आढळून आले आहेत.
भाऊसाहेब नामदेव पडुळकर हे मुळचे जालना जिल्ह्यातील काजळा येथील रहिवाशी असून गेल्या अनेक वर्षापासून ते कुटुंबासह वाळूजला वास्तव्यास आहेत. भाऊसाहेब पडुळकर यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी जनाबाई हिच्यासोबत दुसरे लग्न केले. दुसरी पत्नी जनाबाई हिच्यापासून त्यांना मुलगा आकाश, सोनुबाई, मोनुबाई या दोन विवाहित मुली आहेत. भाऊसाहेब पडुळकर हे गत ८ महिन्यापासून बजाज कंपनीसमोर असलेल्या अशोक मुकुंदा दाभाडे (रा. उस्मानपुर) यांच्या बाबा ट्रक बॉडी रिपेअरींग वर्क्स या गॅरेजवर सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. रविवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास ते जेवणाचा डबा घेऊन गॅरेजवर नाईट शिफ्टला कामासाठी घराबाहेर पडले होते.
दगडाने ठेचून केला निर्घृण खून
आज सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अशोक दाभाडे हे गॅरेजवर आले असता त्यांना बाजूच्या शेडसमोरील जागेत अत्यवस्थ सुरक्षारक्षक भाऊसाहेब पडुळकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. दाभाडे यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षारक्षक पडुळकर यांचा चेहरा दगडाने ठेचून छिन्नविच्छीन्न करण्यात आला आहे.
घटनास्थळी जाळपोळीचे निशाण
घटनास्थळी पडुळकर यांचा जेवणाचा डबा आणि मोपेडचे स्पेअरपार्टस जळालेले आढळून आले. तसेच त्यांचा मोबाइल घटनास्थळापासून दूर आढळून आला. सुरक्षारक्षक पडुळकर आणि मारेकऱ्यांमध्ये वाद झाल्यानंतर खून करण्यात आला असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे. घटनास्थळ सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सातारा पोलीसांनी तपास सुरु केला आहे.