आठ लाखांसाठी निवृत्त बसचालकाची निर्घृण हत्या; शिर व धड फेकले वेगवेगळ्या ठिकाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 07:54 PM2020-07-13T19:54:40+5:302020-07-13T19:57:57+5:30

मुलाने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात मुजीब अहेमद खान  बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. शिवाय लिपिक अतिक  काझीवर संशय व्यक्त केला होता.

The brutal murder of a retired bus driver for eight lakhs; Head and body thrown in different places | आठ लाखांसाठी निवृत्त बसचालकाची निर्घृण हत्या; शिर व धड फेकले वेगवेगळ्या ठिकाणी

आठ लाखांसाठी निवृत्त बसचालकाची निर्घृण हत्या; शिर व धड फेकले वेगवेगळ्या ठिकाणी

googlenewsNext
ठळक मुद्देपैशांसाठी तगादा लावल्याने केली हत्या  मृत आणि आरोपी एसटी महामंडळाचे कर्मचारी

औरंगाबाद : उसने घेतलेल्या पैशासाठी तगादा लावल्याने निवृत्त बसचालकाचे लिपिकाने साथीदाराच्या मदतीने अपहरण करून धारदार शस्त्राने शिर धडावेगळे केले. सातारा परिसरातील पडक्या घरात शिर, तर पोत्यात बांधून धड एका विहिरीत फेकून दिल्याची घटना सोमवारी सकाळी समोर आली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.

मुजीब अहमद खान (५९, रा. शाहनगर), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लिपिक अतिकौद्दीन काझी कमीउद्दीन काझी( ३६, रा . न्यू एस टी कॉलनी , कटकटगेट परिसर ) आणि अफरोज खान जलील खान ( वय ३६ , रा . बायपास ) अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार  मुजीब खान हे एस.टी. महामंडळात बसचालक होते. चार महिन्यांपूर्वी ते सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या कार्यालयातील लिपिक काझी याने खान यांना गोड बोलून त्यांना महामंडळाकडून मिळालेल्या ग्रॅच्युईटीच्या रकमेपैकी ८ लाख रुपये महिनाभरासाठी उसने म्हणून घेतले होते. खान दोन महिन्यांपासून काझीला पैसे परत मागत होते. आज देतो, उद्या देतो असे सांगून काझीने वेळ मारून नेण्यास सुरुवात केली होती. मात्र, खान यांनी जास्तच तगादा लावल्याने काझीने मित्राच्या मदतीने त्यांचा काटा काढण्याचा कट रचला. 

काझीने खान यांना ९ जुलै रोजी त्याने पैसे घेण्यासाठी समर्थनगर येथील  एसटी महामंडळाच्या  कार्यालयात बोलावले. निवृत्ती  पेन्शनसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करू आणि काझीकडून पैसे घेऊन येतो, असे सांगून खान घराबाहेर पडले  होते.  त्यांनी काझी याच्यासोबत पैसे आणण्यासाठी जात असल्याचे घरी नातेवाईकांना फोन करून कळविले होते. मात्र, ते घरी परतलेच नाहीत. याबाबत त्यांच्या मुलाने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात मुजीब अहेमद खान  बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. शिवाय लिपिक अतिक  काझीवर संशय व्यक्त केला होता. 

पोलिसांनी संशयित आरोपी काझीची चौकशी केली. मात्र, तो खान भेटून गेल्याचे सांगत होता. घटनेच्या दिवशी अन्य दुसरी व्यक्ती  असिफसोबत असल्याचे समजल्याने पोलिसांनी संशयावरून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. दोन्ही आरोपींच्या जबाबात विरोधाभास असल्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावल्याने त्यांना खाक्या दाखविताच त्यांनी गुह्याची कबुली दिली. मृत खान हे पैशासाठी तगादा लावत असल्यामुळे ९ तारखेला त्यांचे अपहरण करून मित्राच्या घरी नेले. तेथे मित्र  असिफच्या मदतीने धारदार शस्त्राने खान यांचे शिर धडावेगळे करून हत्या केली. यानंतर रात्री सातारा परिसरातील पडक्या आणि वापरात नसलेल्या एका घरात त्यांचे शिर फेकून दिले, तर धड पोत्यात बांधून नवीन सोलापूर बायपासजवळील निर्जन विहिरीत टाकल्याचे सांगितले.

शिर आणि कुजलेले धड पोलिसांनी  केले हस्तगत
पोलिसांनी दोन्ही आरोपींना सोबत घेऊन दोन्ही  घटनास्थळे गाठली.  चाटे स्कूलमागील एका घरात फेकून दिलेले शिर पोलिसांनी जप्त केले. यानंतर नवीन सोलापूर महामार्गाजवळील निर्जन विहिरीत पाण्यावर तरंगत असलेले पोत्यात बांधलेले धड पोलिसांना दिसले. घटनास्थळ पंचनामा करून धड आणि शिर उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस  उपनिरीक्षक  संदीप शिंदे तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल देवकर, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. 

Web Title: The brutal murder of a retired bus driver for eight lakhs; Head and body thrown in different places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.