ऊसतोड कामगाराचा कर्नाटकात निर्घृण खून; हतबल कुटुंबियांच्या मदतीला धावले धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 11:56 AM2022-01-14T11:56:58+5:302022-01-14T11:58:02+5:30
Dhananjay Munde: दोन दिवसांपासून थांबलेले शवविच्छेदन करून घेतले, मृतदेह गावी आणण्याची केली व्यवस्था
- राम शिनगारे
औरंगाबाद : कर्नाटकात ऊसतोडणीसाठी गेलेल्या एका मजुराचा मुकादम आणि त्याच्या दोन मुलांनी किरकोळ वादातून मंगळवारी रात्री खून केला. त्या कामगाराच्या मृतदेहाचे दोन दिवसांपासून शवविच्छेदन होत नव्हते. याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मिळाली. त्यांनी तत्काळ सर्व यंत्रणा कामाला लावून संबंधित कुटुंबाला मदत केली. तसेच मृतदेह गावी आणण्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्थाही केली.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील यशवंत सुभाष सोनकांबळे (३२) हे कर्नाटक राज्यातील लोकापूर (ता. मुदोळ, जि. बागलकोट) येथे काही जणांसोबत ऊसतोडणीला गेले होते. त्यांचा मुकादमाने किरकोळ वादातून मंगळवारी रात्री खून केला. तेव्हापासून गुरुवारी दुपारपर्यंत मृतदेहाची उत्तरीय तपासणीच करण्यात येत नव्हती. या प्रकाराची माहिती ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला कर्नाटकातून भगवान शिनगारे यांनी दिली. तसेच तत्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना टॅग करीत मदतीसाठीचे व्टिट केले.
तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता भांगे यांना मेसेजद्वारे माहिती दिली. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती मंत्री मुंडे यांना सांगितली. त्यानंतर मुंडे यांनी स्वत:च्या कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या कामाला लावले. मुदोळ येथील आरोग्य अधिकारी मुडूगल यांच्याशी संपर्क साधत शवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टर पाठवले. तसेच बीडचे पोलीस अधीक्षक ए. राजा यांनी बागलकोट येथील पोलीस अधीक्षक व संबंधित पोलीस ठाण्यास संपर्क साधत मदत मिळवून दिली. त्याच वेळी मुंडे यांनीही मृतांच्या नातेवाइकांशी फोनवरून संपर्क साधून सांत्वन करीत धीर दिला.
रुग्णवाहिकेची व्यवस्था
मृतदेह माजलगाव तालुक्यातील गावी आणण्यासाठी त्या ऊसतोड मजुराच्या नातेवाइकांकडे पैसेही नव्हते. तेव्हा मंत्री मुंडे यांच्या कार्यालयानेच ॲब्युलन्ससाठी लागणारा सर्व खर्च संबंधितांना पाठविला. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ वाजता मृतदेह बीडकडे रवाना झाला.
मदत करणे कर्तव्यच
ऊसतोड कामगार कोठेही अडचणीत सापडला असेल तर त्यास मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कर्नाटकातील मृत कामगाराच्या कुटुंबीयांना मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
- धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री