मित्राला भांडल्याचा जाब विचारल्याने भरचौकात तरूणाची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 02:10 PM2021-08-09T14:10:06+5:302021-08-09T14:12:56+5:30
तू माझ्या मित्रासोबत का भांडला असे आकाशने आरोपी गणेशला विचारले.
औरंगाबाद: दोन दिवसापूर्वी मित्राला भांडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरूणाची धारदार चाकू, दांडे ,रॉड आणि फरशीचे तुकडे डोक्यात घालून तरूणाची गल्लीत फिल्मस्टाईल निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना हनुमाननगर गल्ली क्रमांक २ मध्ये रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. ही हत्या करणार्या एका महिलेसह तिचे दोन मुले आणि मित्रांना पोलिसांनी अटक केली. हत्या करणार्या तनपुरे कुटुंबाची हनुमाननगर परिसरात प्रचंड दहशत असल्याने तनपुरे कुटुंब तरूणावर वार करीत होते, तेव्हा चौकात आणि गल्लीत उभे असलेल्या बघ्यांपैकी कोणीही तरूणाला वाचविण्यासाठी पुढे आले नव्हते.
आकाश रुपचंद राजपूत(२१,रा. गजानननगर) असे मृताचे नाव आहे. गणेश रविंद्र तनपुरे, (१९), ऋषिकेश रविंद्र तनपुरे(२१), मंगल, रविंद्र तनपुरे(४०)संदीप त्रिंबक जाधव(४५),राहुल युवराज पवार(२४, सर्व रा. हनुमाननगर, गल्ली नंबर २ ) अशी आरोपींची नावे आहेत. याघटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, गणेश तनपुरे याचे दोन दिवसापूर्वी हुसेन कॉलनीत मृत आकाशच्या मित्रासोबत भांडण झाले होते. ही बाब आकाशला समजल्यानंतर त्याने गणेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. यातून त्यांच्यात हमरी तुमरी वाद झाली होती. दरम्यान रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आकाश राजपूत त्याचा मित्र सागर केशभट मोटारसायकलने विजयनगर येथून हनुमाननगर येथील चौकात पानटपरीवर सिगारेट पिण्यासाठी गेले. तेथून गणेश तनपुरे आणि अन्य आरोपी तेथे उभे होते.
तू माझ्या मित्रासोबत का भांडला असे आकाशने आरोपी गणेशला विचारले. याचा राग आल्याने आरोपींनी आकाशवर चाकू, लाकडी दांडे, रॉड आणि फरशीच्या तुकड्याने हल्ला चढविला. यात तो गंभीर जखमी झाल्यावर आकाश पळत जाऊन गल्लीत पडला.यानंतर आरोपी तेथे जाऊनही त्याच्या डोक्यात फरशीच्या तुकडे घातले. या घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी आकाशला घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान पहाटे आकाशचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, हवालदार बाळाराम चौरे आणि कर्मचार्यांनी आरोपींना ताब्यात घेतले.