देशातील महिला अत्याचारांची क्रूरता चिंताजनक : वृंदा करात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:18 PM2020-02-15T12:18:33+5:302020-02-15T12:21:43+5:30
देवगिरी महाविद्यालयात फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत प्रतिपादन
औरंगाबाद : देशभर महिलांवरील अत्याचाराच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याकडेच सतत लक्ष वेधले जाते. मात्र, त्या अत्याचारातील क्रूरता भयंकर आहे. महिलांनी सांस्कृतिक लक्ष्मणरेषा ओलांडल्याच्या आविर्भावातून होणारे अत्याचार गंभीर आहेत. महिला सक्षमीकरणाच्या कितीही गप्पा मारल्या तरी ही सांस्कृतिकतेची मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचे सक्षमीकरण होणार नाही, असे विचार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या माजी खासदार वृंदा करात यांनी मांडले.
देवगिरी महाविद्यालयात फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत वृंदा करात यांनी ‘भारतीय महिला सबलीकरण’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी अॅड. सुखदेव शेळके होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो, संस्थेचे सचिव आ. सतीश चव्हाण, प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे आणि उपप्राचार्या डॉ. सी.एस. पाटील उपस्थित होते.
वृंदा करात म्हणाल्या, महिलांना बिगरपगारी कामे करावी लागतात, ही कामे घरातील असतील किंवा बाहेरची. त्याचा पगार मिळत नाही. त्याचवेळी महिलांना घरातील संपत्तीमध्येही वाटा दिला जात नाही. महिला घराबाहेर पडली, तर तिच्याविषयी समाजात चर्चा केली जाते. स्त्री-पुरुष समानता ही महिलांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला मिळेल तेव्हा येईल. त्यास समाजाची स्वीकृती मिळाली पाहिजे. समाज तंत्रज्ञानानुसार सर्व पातळ्यावर आधुनिक होत असताना जातिप्रथा, धर्म आणि महिलांविषयीचे विचार बलण्यास तयार नाही. हा विचार बदल करण्यासह त्यास समाजाची स्वीकृती मिळाली पाहिजे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ ३ टक्के आहे. महिला अत्याचारावर फाशी हा उपाय नाही. मुळात आपली धार्मिक आणि सांस्कृतिक संरचना बदलली पाहिजे. संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे पुरुष वागतात. त्यातूनच हे अत्याचार होत आहेत. त्यामुळे धर्म-जातीच्या नावासह संस्कृतीच्या नावावर महिलांसाठी बनविलेले कारागृह तोडले पाहिजेत. त्याशिवाय महिला सक्षम होणार नाहीत. आता मुळावरच घाव घालण्याची गरज निर्माण झालेली आहे, असेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे यांनी केले. परिचय डॉ. भालचंद्र कांगो यांनी करून दिला. सूत्रसंचालन करून डॉ. सी.एस. पाटील यांनी आभार मानले.
नारीवाद गाली हो गई है
सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक ढाचा सोडून महिलांचे सक्षमीकरण होऊ शकत नाही. रूढी-परंपरांनी त्यात अडथळे निर्माण केले आहेत. याविरोधात बोलणाऱ्या महिलांना टार्गेट केले आहे. ‘नारीवादी (स्त्रीवादी) गाली हो गाई है’ अशी खंतही वृंदा करात यांनी व्यक्त केली. भारतीय इतिहासात कोठेही महिला सक्षमीकरण चळवळीने पुरुषांना टार्गेट केलेले नाही. पुरुषांच्या विरोधात ही चळवळ कधीही नव्हती आणि नसेल, असेही त्यांनी सांगितले.
महिलांचे नेतृत्व जनता स्वीकारते; पण...
महिलांचे नेतृत्व जनतेने कधीही नाकारलेले नाही. इंदिरा गांधी, मायावती, सोनिया गांधी आदींचे नेतृत्व जनतेने स्वीकारले. मात्र, राजकीय पक्षांनाच महिला चालत नाहीत. लोकसभेच्या ५४४ जागांपैकी केवळ २३ जागांवर महिला खासदार आहेत. त्यामुळे महिलांना लोकसभा निवडणुकीत आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. संसदेत महिलांच्या प्रश्नांसंबंधी काही चर्चा असेल, तर पुरुष खासदार वेगळ्या पद्धतीची गॉसिपिंग करतात, असा अनुभवही त्यांनी सांगितला.
मानधन नाकारले
देवगिरी महाविद्यालयाच्या प्रशासनातर्फे व्याख्यान झाल्यानंतर वृंदा करात यांना मानधनाचे पाकीट देण्यात आले. तेव्हा मार्गदर्शन केल्यानंतर पाकीट घेण्याची आमच्या पक्षाची प्रथा, परंपरा नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी मानधन नाकारले.