लॉंग डीस्टन्स रिलेशनशिपचा फुगा फुटला; कोलकात्याहून लग्नासाठी आलेल्या मैत्रिणीला न भेटताच मित्र गावी पळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 05:57 PM2020-11-25T17:57:23+5:302020-11-25T18:13:29+5:30
पुंडलिकनगर पोलिसांनी नातेवाईकांकडे तरुणीला सुपूर्द केले
औरंगाबाद : टिकटॉक, फेसबुक आणि इंस्टाग्राम या समाजमाध्यमावर ओळख झालेल्या मित्राला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी ती थेट कोलकात्याहून औरंगाबादला आली. मात्र तिला टाळण्यासाठी मित्र गावी निघून गेला. ही बाब समजताच पुंडलिकनगर पोलिसांनी तरुणीचे नातेवाईक आणि स्थानिक पोलिसांना बोलावून घेतले आणि तिला त्यांच्या स्वाधीन केले.
कोलकाता येथील रहिवासी १६ वर्षाच्या तरुणीची (दहावीत शिकते )औरंगाबाद शहरातील एका तरुणासोबत टिक टॉक या समाज माध्यमावर ओळख झाली. टिकटॉक बंद झाल्यामुळे दोघे फेसबूक आणि इंस्टाग्राम या समाजमाध्यमाच्या मित्र झाले. यादरम्यान त्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक परस्परांना दिल्याने ते व्हॉटसॲपवर चॅटिंग करीत. व्हिडिओ कॉल करून संवाद साधत.
यातच २० नोव्हेंबर रोजी आई रागावल्याने ती घरातून १७ हजार रुपये घेऊन घराबाहेर पडली. हावडा रेल्वे जंक्शन येथून रेल्वेने ती नागपूरला आली. नागपूर येथून अकोला येथे आणि अकोल्याहून २४ रोजी औरंगाबादला पोहचली. या प्रवासादरम्यान ती तिच्या मित्रासोबत फोनवर बोलत होती. मात्र ती खरेच औरंगाबादला येईल असे त्याला वाटत नव्हते. तिने बोलतांना त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी आणि कायम येथे राहण्यासाठी आल्याचे सांगितले. यामुळे तो घाबरून गेला. तिला न भेटता तो गावी निघून गेला.
गॅरेजचालकाच्या घरी केला मुक्काम
तो मुकुंदवाडी परिसरातील चारचाकी मोटार गॅरेजवर काम करतो. त्याने तिला तोच पत्ता दिला होता. यामुळे ती काल सायंकाळी गॅरेजवर पोहचली. त्याने गॅरेजमालक यांना फोन करून ती येणार आहे. मात्र तिच्यामुळे नाहक पोलिसांचे लचांड मागे लागेल या भीतीपोटी गावी गेल्याचे सांगितले. यानंतर गॅरेजचालकाने ही बाब पुंडलिकनगर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याशी संपर्क साधून तरुणीविषयी माहिती दिली.
नातेवाईकाच्या दिले ताब्यात
तरुणीकडून तिच्या नातेवाईकांचा क्रमांक घेऊन सपोनि सोनवणे आणि पोलीस उपनिरीक्षक विकास खटके यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. यानंतर बंगळूरू येथे राहणारी तिची आत्या आणि आत्याचे पती विमानाने आज सकाळी औरंगाबादला आले. पोलिसांनी तिला त्यांच्या ताब्यात दिले आणि सोशल मिडियावरील आभासी प्रेमाचे डोक्यावरील भूत उतरविले.