शिवमणींच्या ‘खजिन्या’त छत्रपती संभाजीनगरातील ‘बकेट’ वाद्य

By संतोष हिरेमठ | Published: February 27, 2023 08:27 AM2023-02-27T08:27:52+5:302023-02-27T08:28:09+5:30

विद्यार्थ्यांकडे पाहिले वाद्य : तालयोग्याचे वाद्याप्रति असेही प्रेम, काही तासांत मिळाले वाद्य

'Bucket' instrument from Chhatrapati Sambhajinagar in Shivamani's 'Khajinya' | शिवमणींच्या ‘खजिन्या’त छत्रपती संभाजीनगरातील ‘बकेट’ वाद्य

शिवमणींच्या ‘खजिन्या’त छत्रपती संभाजीनगरातील ‘बकेट’ वाद्य

googlenewsNext

संतोष हिरेमठ 
लोकमत न्यूज नेटवर्क 
छत्रपती संभाजीनगर : डोक्याला लाल रुमाल बांधलेला, डोळ्यांवर काळा गाॅगल, गळ्यात जाडसर चेन असा पेहराव असलेले एक गृहस्थ विमानतळावर ढोल-ताशा वाजविणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळ बोलावतात. विद्यार्थ्यांच्या हातातील ‘बकेट’ नावाचे वाद्य स्वत: वाजवून पाहतात अन् लगेच त्या वाद्याच्या प्रेमात पडतात. ते कुठे मिळेल, असे ते विचारतात. मात्र, विद्यार्थ्यांना सांगता येत नाही.  हे दृश्य पाहून ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्या व्यक्तीशी संवाद साधला आणि त्यांना हवे असलेले ते वाद्य काही तासांत उपलब्ध करून दिले. ही व्यक्ती म्हणजे जगप्रसिद्ध ड्रमवादक तालयोगी शिवमणी.

जी-२० अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असलेल्या वूमन-२० परिषदेसाठी रविवारी सकाळी परदेशी पाहुण्यांचे शिष्टमंडळ विमानतळावर आले. मुकुंदवाडी येथील मनपा शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत केले. या शाळेतील तेजस मगरे, लकी नाडे आणि वैभव दांडगे हे तिघे ढोल, ताशा आणि ‘बकेट’ वाजवत होते. वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी शिवमणी हे रविवारी विमानतळावर दाखल झाले.

विद्यार्थ्यांना म्हणाले, कुठे मिळेल हे?
शिवमणी यांनी ‘हे बकेट वाद्य कुठे मिळेल’ अशी विचारणा केली. परंतु, विद्यार्थ्यांना सांगता आले नाही. तेव्हा ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. ‘वाद्य मिळाल्यास महोत्सवाच्या ठिकाणी यावे’, असे शिवमणी म्हणाले.  

वाद्य मिळाल्याचा आनंद
‘लोकमत’ प्रतिनिधीने विद्यार्थ्यांशी पुन्हा संवाद साधला. विद्यार्थ्यांनी  मछली खडक येथील दुकानातून ते वाद्य घेत महोत्सवाच्या ठिकाणी जाऊन शिवमणींना देण्यात आले. तेव्हा त्यांनी मोठा आनंद व्यक्त करत आपल्या तालवाद्यांच्या ताफ्यात येथील ‘बकेट’ वाद्याचा समावेश केला.

Web Title: 'Bucket' instrument from Chhatrapati Sambhajinagar in Shivamani's 'Khajinya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.