वडगावात बुद्ध पौर्णिमा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:02 AM2021-05-27T04:02:07+5:302021-05-27T04:02:07+5:30
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील आनंद बुद्धविहारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बुधवारी साधेपणाने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. ...
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील आनंद बुद्धविहारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बुधवारी साधेपणाने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमात मुकेश साळवे यांनी त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेतली तर विहारचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बुद्ध पौर्णिमेविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला राजू दीक्षित, विनोद वाकोडे, जगन्नाथ निकम, देवीदास परकारे, मगन निकम, नामदेव केदारे, श्रावण खरात, रोहित साळवे, बाळासाहेब साळवे, शुभम केदारे आदींची उपस्थिती होती.
------------------------
सय्यद राऊफ यांचे निधन
वाळूज महानगर : सय्यद राऊफ सय्यद जहाँगीर (४०, रा. वाळूज ) यांचे बुधवारी (दि. २६) अल्पशा आजाराने निधन झाले. येथील कब्रस्तानात त्यांंचा दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
फोटो क्रमांक-सय्यद राऊफ
------------------------
सिडको महानगरातील पथदिवे बंद
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील कचरा डेपो परिसरातील पथदिवे बंद असल्याने नागरिक व वाहनधारकांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. पथदिव्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे सिडको प्रशासन कानाडोळा करीत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. या भागातील पथदिवे सुरू करण्यासंदर्भात तक्रारी करूनही सिडको प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे.
------------------------
दुचाकी चोरणारे दोघे जेरबंद
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातून दुचाकी चोरून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री नगररोडवर पकडले. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे कर्मचारी मंगळवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास नगर रोडवर गस्त घालत असताना दोन संशयित इसम दुचाकी लोटत घेऊन जात असल्याचे पथकाला दिसून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सत्यम सुरेश भट (२२, रा. चंदनझिरा, जालना) व वैभव वैजनाथ धनवटे (२१, रा. पाथरी, जि.परभणी) असल्याचे सांगितले. या दोघांकडे दुचाकी (एमएच २१ डीई ४७२५) मिळून आली असून, ही दुचाकी चोरून दोघे फरार होताना पोलिसांना मिळून आले.
---------------------
पंढरपूर जुन्या बसस्थानकालगत खड्डे
वाळूज महानगर : पंढरपुरातील जुन्या बसस्थानकालगतच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताचा धोका बळावला आहे. या रस्त्यावर वाहनधारक व कामगारांनी सारखी वर्दळ असल्याने ये-जा करणाऱ्यांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी आरमान शेख, शार्दुल शिंदे, शिवराम काकडे आदींनी केली आहे.
--------------------------