लेण्यांतून घडतेय बौद्ध तत्त्वज्ञानाचे दर्शन;छत्रपती संभाजीनगर परिसरात ऐतिहासिक वारसा
By संतोष हिरेमठ | Published: May 5, 2023 12:33 PM2023-05-05T12:33:48+5:302023-05-05T12:35:03+5:30
अजिंठा- वेरूळच नाही तर पितळखोरा, विद्यापीठाजवळील बुद्ध लेणी आणि सिल्लोड तालुक्यातील घटोत्कोच लेणीत बौद्ध तत्त्वज्ञान चित्रशिल्प रूपात पाहायला मिळते
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात आणि परिसरात हजारो वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक लेण्यांचा ठेवा आणि वारसा आहे. या लेण्यांमधून दररोज हजारो पर्यटकांना तथागत गौतम बुद्धांचे दर्शन घडते आहे. बौद्ध धम्माचा संदेश यातून शतनानुशतके दिला जातो आहे. हा वैचारिक व सांस्कृतिक ठेवा हजारो वर्षे टिकून राहतील, यादृष्टीने संवर्धनासाठी सर्व स्तरांतून प्रयत्नही केले जात आहे.
अजिंठा लेणी
जागतिक वारसा अजिंठा लेण्यात गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा आणि बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या कलेचा अनोखा अविष्कार पाहायला मिळतो. विहार आणि चैत्य अशा दोन प्रकारे लेण्यांची निर्मिती केलेली आहे. या लेण्यांमधील भिंती आणि छतांवरील चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनावरील विविध प्रसंग आणि अनेक बौद्ध विभूतींचे चित्रण पाहायला मिळते.
वेरूळ लेणी
जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील दहा नंबरच्या लेणीतील बुद्ध मूर्तीवर दरवर्षी मार्च महिन्यात अद्भुत किरणोत्सव होतो. हा किरणोत्सव डोळ्यांत साठवण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातील पर्यटक गर्दी करतात. स्थापत्य कलेचा अद्भूत नमुना असलेल्या वेरूळ लेणीमध्ये एकूण ३४ लेण्या आहेत. त्यातील दहा नंबरच्या लेणीवर उत्तरायणात सूर्यकिरणे येतात आणि बुद्धमूर्ती उजळून निघते.
बुद्ध लेणी
छत्रपती संभाजीनगर शहरातील बीबी का मकबरापासून जवळपास किलोमीटर अंतरावर बुद्ध लेणी आहे. ही बुद्ध लेणी असल्याचा पहिला संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. त्यात लेण्यांची संख्या १२ इतकी आहे. अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांशी या लेणींचा संबंध लावला जातो.
घटोत्कोच लेणी
सिल्लोड तालुक्यातील अंभई गावापासून सात ते आठ किलो मीटरवरील जंजाळा गावाच्या उत्तरेस अजिंठा डोंगररांगेत ५०० मीटर अंतरावर घटोत्कोच ही बुद्ध लेणी कोरलेली आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असणाऱ्या अजिंठा लेणीच्या तुलनेत ही लेणी फारशी परिचित नाही. घटोत्कोच बुद्ध लेणी अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असून, पाहण्यासारखे ठिकाण आहे.
पितळखोरा लेणी
जिल्ह्यातील कन्नडजवळील गौताळ अभयारण्यात आद्य लेणी असलेल्या पितळखोरा लेणीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. साधारण इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील या लेणीवर इ.स.च्या दुसऱ्या शतकात उपलब्ध असलेल्या जागेतून महायान/ महासांघिक पंथाने लेणीच्या स्थापत्य शिल्पकलेतून आपल्या मान्यता न मांडता भित्तिचित्रे तयार करून घेतली. विशेष म्हणजे अजंठा लेणीतील भित्तिचित्रांच्या आधीची ही भित्तिचित्रे आहेत. यात सम्यक समबुद्ध व बोधिसत्त्व यांना सुंदरपणे चितारण्यात आले आहे. तीन प्रकारची भित्तिचित्र ही या लेणीचे वैशिष्ट्य, मुख्य चैत्यगृहातील प्रदक्षिणा पथाच्या डाव्या बाजूस पांढऱ्या रंगाचे चीवर परिधान केलेले सम्यक समबुद्ध यांचे भित्तिचित्र आहे. याच ठिकाणी आपल्याला मुचलिलंद नागाचे, तसेच बोधिसत्त्वदेखील उत्कृष्टरीत्या चितारलेले पाहायला मिळतात, असे लेणी अभ्यासक सूरज रतन जगताप यांनी सांगितले.
९९ टक्के लेण्यांमध्ये शिल्प, चित्र
जवळपास ९९ टक्के लेण्यांमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती, शिल्प अथवा चित्र पाहायला मिळतात. वेरुळ येथील १० नंबरच्या लेणी सुंदर अशी बुद्ध मुर्ती आहे.
- डाॅ. संजय पाईकराव, सचिव, मूर्ती व शिल्प संशोधन संस्था