लोकुत्तराविहार परिसरात ५० फूट उंचीची बुद्ध मूर्ती; १८ मे रोजी होणार प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 07:42 PM2019-05-16T19:42:55+5:302019-05-16T19:49:24+5:30
मूर्तीच्या रंगरंगोटीचे काम सुरू, रोषणाई व लेसर किरणांनी वेधणार लक्ष
औरंगाबाद : शहरापासून अवघ्या पंधरा कि.मी. अंतरावरील अजिंठा रोडवरील चौका परिसरात लोकुत्तरा आंतरराष्ट्रीय भिक्खू प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात ५० फूट उंच बुद्ध मूर्तीची उभारणी होत आहे. बुद्धपौर्णिमेच्या दिवशी १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या नेत्रदीपक सोहळ्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
यासंदर्भात पूज्य भदन्त बोधिपालो महास्थवीर यांनी माहिती देताना सांगितले की, नव्याने उभारण्यात येत असलेले बुद्धरूप धवल रंगात असून, यामुळे महाविहाराच्या व आंतरराष्ट्रीय भिक्खू प्रशिक्षण केंद्राच्याच नव्हे, तर औरंगाबादच्याही वैभवात भर पडणार आहे. रात्रीच्या वेळी त्यावर लेसर किरणोत्सव सुरू झाल्यावर येथील नजारा पाहण्यासारखा असेल. सहल म्हणून आपल्याला येथे कधीही येता येईल; पण भिक्खू संघाने आयोजित केलेला हा सोहळा पाहणे ही एक पर्वणीच होय. पन्नास फूट उंच असलेली बुद्धाची ही मूर्ती फायबरमध्ये बनविण्यात आली आहे. आसनस्थ असणारी ही बुद्ध मूर्ती धवल रंगात आहे. या मूर्तीवर वातावरणाचा परिणाम होणार नाही. अतिशय उच्च प्रतीचा रंग या मूर्तीवर लावण्यात येणार आहे.
नागपूर येथील प्रज्ञा मूर्तिकार यांच्याकडे या मूर्तीची गत वर्षापासून तयारी सुरू होती. बुद्धाब्द २५६३ या बौद्ध वर्षाच्या प्रथमदिनी मूर्तीचे लोकार्पण करण्यात येत आहे. यावेळी पूज्य भदन्त बोधिपालो महास्थवीर हे मार्गदर्शक, तर डॉ. लॉबसांग सांग्वे (धम्मशाला) आणि देश-विदेशातील वंदनीय भिक्खू संघाची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.
राज्यातील सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोजाना यांच्या धम्मदानातून हे केंद्र भिक्खू संघास अर्पण करण्यात आले आहे. चौका परिसरातील ही मूर्ती अजिंठ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. या परिसराचे सुशोभीकरणही करण्यात आले आहे.
नागपूर ते औरंगाबाद सुरक्षित प्रवास
चौका परिसरात ६ एकर जमिनीवर लोकुत्तरा महाबुद्धविहार, तसेच विपश्यना केंद्र, आंतरराष्ट्रीय ट्रेनिंग सेंटर, गेस्ट हाऊस, तसेच उद्यान विकसित केले आहे. डोंगरावर विशिष्ट मनमोहक हिरवळ उन्हाळ्यातही दिसत असून, रंगीबेरंगी झाडा-फुलांची विहार परिसराची शोभा वाढविण्यास मदत झाली आहे. उद्यानात ५० फूट उंच बुद्ध मूर्ती बसविली जात आहे. नागपूर येथे मूर्तिकाराने ती फायबरमध्ये तयार केली असून, नागपूर ते औरंगाबादपर्यंतचा तिचा प्रवास हा एका मोठ्या ट्रकमधून करण्यात आला. ती अगदी सुरक्षित आणि सुरळीत घेऊन येणेदेखील जिकिरीचे होते म्हणून ती विविध पार्ट करून औरंगाबादेत आणण्यात आली.
मार्बलच्या चबुतऱ्यावर प्रतिष्ठापना
उद्यानात मार्बलमध्ये बनविलेल्या चबुतऱ्यावर ती विराजमान करण्यात येत आहे. २० पेक्षा अधिक कारागीर त्या मूर्तीच्या पार्टला जुळवून तिला मूळ रूप देत आहेत. या कामासाठी कारागीर अथक परिश्रम घेताना दिसत आहेत. अजिंठा लेणीकडे ये-जा करणाऱ्या पर्यटकांना विहार तसेच मूर्तीचे रूपही प्रेरणादायी ठरणार आहे. रात्री मूर्तीवर लेसर किरणांच्या प्रकाशझोतात नेत्रदीपक दृश्य दिसणार असून, औरंगाबादकरांसाठी पर्यटनाचीच पर्वणी ठरणार आहे.