विश्वशांती बुद्ध विहार परिसरात बुद्धिस्ट फेस्टिवल
By साहेबराव हिवराळे | Published: April 18, 2023 09:19 PM2023-04-18T21:19:33+5:302023-04-18T21:25:26+5:30
भिक्खुणी धम्मदर्शना महाथेरी यांची पत्रकार परिषदेत माहिती
छत्रपती संभाजीनगर : विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंतीनिमित्त भीम टेकडी परिसरातील विश्वशांती बुद्ध विहार येथे ५ मे ला ‘बुद्धिस्ट फेस्टिवल’चे आयोजन केले आहे, अशी माहिती भिक्खुणी प्रा. धम्मदर्शना महाथेरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
बौद्ध धम्मातील संकल्पना समाज विकास व बौद्ध धर्माचा प्रचार - प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त अशा गहन विषयावर बौद्ध विचारांचे थोर अभ्यासक विचारवंत व देश-विदेशातील ज्येष्ठ बौद्ध धम्मगुरू भिक्खुणी, भिक्खू संघ व विचारवंत मार्गदर्शन करणार आहेत.
पहाटे ३ वाजता भगवंतांची महापूजा व दीपउत्सव साजरा केला जाईल, पहाटे ४ ते ५ महापरित्राण, सकाळी ५ ते ६ वाजता ध्वजारोहण होईल. सकाळी ६ ते ७ वाजता उपस्थित उपासकांना अष्टशील देण्यात येईल. त्यानंतर सकाळी ७ ते ८ धम्मदेशना होईल, सकाळी ११ ते १२ भोजनदान देण्यात येईल. दिवसभर बौद्ध धम्म गुरू, भिक्खुणी संघ, विचारवंत यांचे मार्गदर्शन रात्री १० वाजेपर्यंत होणार आहे.
डॉ. बी. आर. आंबेडकर हॉस्पिटल २०२५ पर्यंत पूर्ण
या परिसरात १०० खाटांचे डॉ. बी. आर. आंबेडकर हॉस्पिटल बांधण्याचा संकल्प केला आहे. २०२५ पर्यंत हे हॉस्पिटल आरोग्य सुविधासह उपासक उपासिकांच्या साह्यानेच पूर्ण होणार आहे, असे माताजी धम्मदर्शना म्हणाल्या. यावेळी पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्त्या अनिता हिवाळे, सुनीता गुजरंगे, संघमित्रा बनसोड, ज्योती दांडगे, सचिन बनसोडे, जयश्री गजहंस, विजय बचके आदींची उपस्थिती होती.