Budget 2018 : औरंगाबादच्या १,५०० लघु उद्योगांना मिळणार कॉर्पाेरेट कर सवलीतीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:49 PM2018-02-02T13:49:53+5:302018-02-02T13:51:02+5:30
शहरालगतच्या वाळूज, रेल्वेस्टेशन, चितेगाव, शेंद्रा, चिकलठाणा येथील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) अर्थसंकल्पामुळे नवसंजीवनी प्राप्त होण्याचा दावा केला जात आहे. या उद्योगांना २५ टक्के कॉर्पाेरेट करामध्ये सवलत दिल्याने उद्योगांना वार्षिक नफ्यात थेट लाभ होण्याचे संकेत आहेत.
औरंगाबाद : शहरालगतच्या वाळूज, रेल्वेस्टेशन, चितेगाव, शेंद्रा, चिकलठाणा येथील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) अर्थसंकल्पामुळे नवसंजीवनी प्राप्त होण्याचा दावा केला जात आहे. या उद्योगांना २५ टक्के कॉर्पाेरेट करामध्ये सवलत दिल्याने उद्योगांना वार्षिक नफ्यात थेट लाभ होण्याचे संकेत आहेत.
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील उद्योग सर्किटमध्ये ३० ते ४० हजार कोटींची वार्षिक उलाढाल होेते. यातील ४० टक्के उलाढाल ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमधून होते. म्हणजेच १६ हजार कोटींची उलाढाल यातून होते. यातील ५० टक्के म्हणजेच ८ हजार कोटींची उलाढाल ही वार्षिक ५० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या उद्योगांतून होते. ५० कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या उद्योगांसाठी गतवर्षी ३० टक्के कॉर्पाेरेट कर सवलत होती, ती सवलत यावर्षी ५० ते २५० कोटी उलाढाल असलेल्या उद्योगांसाठी २५ टक्के करण्यात आल्याने गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला फायदा होईल, असे वाटते.
उद्योजक प्रशांत देशपांडे म्हणाले, २०० कोटींची उलाढाल असलेल्या उद्योगाचा १० टक्के वार्षिक नफा २० कोटींपर्यंत जातो. त्यावर २५ टक्के कॉर्पाेरेट कर सवलत दिल्यास ५ कोटी सवलतीमुळे वाचतील. ती रक्कम उद्योग विस्तारासाठी उद्योजक वापरण्याची शक्यता वाढेल. या निर्णयाचे चांगले परिणाम आगामी काळात दिसतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
१ हजार उद्योगांना लाभ
सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्रातील सुमारे १ हजार उद्योगांना अर्थसंकल्पातील सवलतींचा लाभ होण्याचा अंदाज व्यक्त होतोय. १०० टक्के उलाढालीमध्ये ४० टक्के वाटा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा, तर ६० टक्के वाटा मोठ्या उद्योगांचा असतो. औरंगाबाद आणि जालना या भागातील इंडस्ट्रीयल सर्किटमध्ये १६ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांतून होते. त्यामुळे अर्थसंकल्पातील कर सवलतींमुळे हे उद्योग मोठ्या प्रमाणात भरारी घेतील, असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला.
लघु उद्योजकांसाठी काहीही नाही
मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक म्हणाले, या अर्थसंकल्पामध्ये लघु उद्योजकांसाठी काहीही नाही. सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योगांचा ३० टक्क्यांवरून २५ टक्के कर कपात करताना उद्योजकांची व्याख्या विचारात घेतलेली नाही. इंडस्ट्री, तंत्रज्ञान एमएसएईसाठी बुस्ट मिळण्याची अपेक्षा होती. लघु उद्योजकांना प्रमोट करण्यासारखी कोणतीही तरतूद नाही.
अर्थसंकल्पाबाबत समाधानकारक प्रतिक्रिया.
- अर्थसंकल्पातील कर सवलतींमुळे हे उद्योग मोठ्या प्रमाणात भरारी घेतील, असा विश्वास.
- सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योगांचा ३० टक्क्यांवरून २५ टक्के कर कपात करताना उद्योजकांची व्याख्या विचारात घेतलेली नाही.
- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसंकल्पामुळे नवसंजीवनी प्राप्त होण्याचा दावा.