Budget 2022: वंदे भारत ट्रेन, कार्गो टर्मिनल्स, पण मराठवाड्याच्या वाट्याला काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 11:37 AM2022-02-02T11:37:28+5:302022-02-02T11:37:37+5:30
अर्थसंकल्पात ४०० वंदे भारत ट्रेन, १०० कार्गो टर्मिनल्सची घोषणा करण्यात आली. मात्र, मराठवाड्यातील रेल्वेच्या वाट्याला नेमके काय आले, हे स्पष्ट झालेले नाही.
औरंगाबाद : अर्थसंकल्पात ४०० वंदे भारत ट्रेन, १०० कार्गो टर्मिनल्सची घोषणा करण्यात आली. मात्र, मराठवाड्यातील रेल्वेच्या वाट्याला नेमके काय आले, हे स्पष्ट झालेले नाही. औरंगाबाद, जालना येथे औद्योगिक वसाहतींच्या दृष्टीने कार्गो टर्मिन्सल उभारले जातील, औरंगाबादसह मराठवाड्यातून वंदे भारत एक्स्प्रेस धावतील, अशी अपेक्षा आहे. वर्षांनुवर्षे रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लागतील काय याची उत्सुकता आहे.
रेल्वेची भाडेवाढ केलेली नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे. मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न, मागण्या आणि प्रस्ताव वर्षानुवर्षे कागदावरच आहेत. तर ज्या प्रकल्पांचे काम सुरू आहे, ते कासवगतीने सुरू आहेत. कारण दरवर्षी अर्थसंकल्पात तुटपुंज्या निधीवर बोळवण केली जाते. यंदा नेमके काय झाले, हे रेल्वेची पिंक बुक आल्यानंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.
पैठणी, हिमरू शाल औरंगाबादची ओळख
अर्थसंकल्पात ‘वनस्टेशन- वन प्रोडक्ट’ची घोषणा केलेली आहे. या योजनेत औरंगाबाद स्टेशनवर पैठणी, हिमरू शाल विक्रीचे आऊटलेट सुरू करता येऊ शकते. त्याद्वारे लघुउद्योजकास चालना देता येऊ शकते. शेती उत्पादनेही येथे विक्री करता येऊ शकतील.
मराठवाड्यासाठी स्पष्टता नाही
रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प असताना मराठवाड्याला काही मिळाले तर तात्काळ समोर येत असे. मात्र, आता नेमके काय मिळाले, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वेसाठी काय मिळाले, हे पुढील दोन दिवसात कळेल, असे वाटते.- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती
वंदे भारत एक्स्प्रेस हवी
स्थानिक उत्पादन पुरवठा साखळीला मदत करण्यासाठी ‘एक स्टेशन, एक उत्पादन’ अशी संकल्पना असलेली योजना तयार करणार आहेत. ४०० वंदे भारत रेल्वे आणण्याची घोषणा केली. त्यामुळे औरंगाबाद ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस चालू करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.- गौतम नाहटा, अध्यक्ष, नमो रेल यात्री ऑर्गनायझेशन
औद्योगिक क्षेत्राला बळ
पीएम गती शक्ती योजनेतून येत्या काळात औरंगाबाद आणि आसपासच्या औद्योगिक क्षेत्राला चांगले बळ मिळू शकते. रेल्वेची पिंक बुक आल्यावर मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी नेमके काय मिळाले, हे समोर येईल.-स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक