मनपाचा अर्थसंकल्प अद्याप अधांतरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:25 AM2018-04-16T01:25:26+5:302018-04-16T01:26:09+5:30
मनपा प्रशासनाने २६ मार्च रोजी १२७४ कोटी ७४ लाख ९५ हजार रुपयांचा ३६ वा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. या अर्थसंकल्पाला अद्याप स्थायी समितीने मंजुरी दिलेली नाही. एवढा मोठा अर्थसंकल्प अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. २० दिवस उलटले तरी नगरसेवकांचा अभ्यासच सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मनपा प्रशासनाने २६ मार्च रोजी १२७४ कोटी ७४ लाख ९५ हजार रुपयांचा ३६ वा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. या अर्थसंकल्पाला अद्याप स्थायी समितीने मंजुरी दिलेली नाही. एवढा मोठा अर्थसंकल्प अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. २० दिवस उलटले तरी नगरसेवकांचा अभ्यासच सुरू आहे.
२६ मार्च रोजी अर्थसंकल्पासाठी स्थायी समितीच्या विशेष बैैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत नवल किशोर राम यांनी सभापती गजानन बारवाल यांना अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्येही राम यांनी सांगितली. यावेळी सभागृहातील सदस्यांनी अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी मागणी केली. सभापतींनी ही मागणी मान्य करून लवकरच स्थायीची बैठक घेऊन अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समितीला विविध विकासकामे टाकायची आहेत. कोट्यवधी रुपयांची कामे यात टाकण्यात येणार आहेत. भाजप नगरसेवकांचे जास्तीत जास्त अर्थसंकल्पाचा फायदा कसा होईल, यादृष्टीने काम सुरू आहे. स्थायी समितीचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी संपत आहे. १६ पैकी ८ सदस्य दहा पंधरा दिवसांनंतर निवृत्त होणार आहेत. यामध्ये स्वत: सभापती बारवाल यांचाही समावेश आहे. स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर सभापती सर्वसाधारण सभेला अर्थसंकल्प सादर करतील. येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये हे शक्य आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सर्वसाधारण सभा किमान १०० कोटी रुपयांची वाढ अर्थसंकल्पात करणार हे निश्चित.