बजेट कोलमडले ! निवडणुकीच्या धामधुमीत महागाईचा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 04:09 PM2019-04-11T16:09:06+5:302019-04-11T16:15:12+5:30
राजकारणी प्रचारात व्यस्त, तर सर्वसामान्यांची महागाईने होरपळ
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जीवनावश्यक वस्तूंचे दर सरासरी ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वधारले आहेत. राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात व्यस्त तर दुसरीकडे सर्वसामान्य महागाईने होरपळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, साबुदाणा महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढला आहे. सरकार व प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यात कुणाकडे वेळ नाही. परिणामी बाजारात जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंची दरवाढ सुरूच आहे. मागील तीन महिन्यांत तूर डाळीच्या भावात किलोमागे ९ रुपयांनी वाढ होऊन ७४ ते ७५ रुपये प्रतिकिलो, हरभरा डाळ ६ ते ८ रुपयांनी वधारून ५८ ते ६० रुपये, मठ डाळ १२ रुपयांनी वाढून ८२ ते ८४ रुपये, मूग व उडीद डाळीत २ रुपयांनी वाढ होऊन अनुक्रमे ७६ ते ७८ रुपये तर ६२ ते ६४ रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. जानेवारीत २६ ते २८ रुपये विक्री होणारी ज्वारी सध्या ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. तर १८ ते २० रुपयांनी मिळणारी बाजरी २४ ते २६ रुपये किलोने विकत आहे.
या दरवाढीनंतरही बाजरी बाजारात कमी उपलब्ध असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तांदूळ क्विंटलमागे दोन ते अडीच रुपयांनी महागून २८ ते ११२ रुपये किलोपर्यंत विकत आहेत. खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने मूग व उडदाचा पेरा कमालीचा घटला होता. तुरीच्या उत्पादनावरही परिणाम झाला होता. पाण्याअभावी रबीत गहू, ज्वारी, हरभऱ्याचा पेराही कमीच झाला होता. गव्हाची मध्यप्रदेश व राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने गव्हात जास्त परिणाम दिसून आला नाही.
नियंत्रण कुणाचे?
राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि शासकीय यंत्रणा सध्या निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना नागरिकांच्या दु:खावर फुंकर घालायला कोणी नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.