पालिकेचे बजेट जाणार ८१० कोटींवर
By Admin | Published: May 19, 2014 01:25 AM2014-05-19T01:25:54+5:302014-05-19T01:33:23+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या बजेटवर २० मे रोजी चर्चा होणार असून, महापौर कला ओझा या बजेटमध्ये सुमारे १५० कोटींची वाढ करणार आहेत.
औरंगाबाद : महापालिकेच्या बजेटवर २० मे रोजी चर्चा होणार असून, महापौर कला ओझा या बजेटमध्ये सुमारे १५० कोटींची वाढ करणार आहेत. त्यामुळे मनपाचे बजेट ८१० कोटींवर जाणार आहे, अशी माहिती सत्ताधार्यांच्या गोटातून समजली आहे. २० मे रोजी बजेटवर सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. एलबीटी भरण्यास व्यापार्यांनी केलेला विरोध पाहता पालिकेची आर्थिक कोंडी होत आहे. मागच्या वर्षीची अनेक कामे झालेली नाहीत. अशा परिस्थितीमध्ये स्थायी समितीने वाढविलेले ११३ कोटी आणि महापौरांकडून आलेल्या संभाव्य १५० कोटी, अशा २६३ कोटींच्या कामांसाठी प्रशासन उत्पन्न कुठून वाढविणार, असा प्रश्न आहे. भाजपा आणि सेनेमध्ये बजेटवरून वाद आहेत. प्रशासनाने दिलेल्या ५४९ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये स्थायी समितीने ११३ कोटी रुपयांची वाढ केली. महापालिका प्रशासनाने वर्ष २०१४-१५ साठी ५४९ कोटी ११ लाख रुपयांचे बजेट सादर केले. ३१ मार्च २०१५ पर्यंत सर्व महत्त्वाचे खर्च करून पालिकेच्या तिजोरीत १९ लाख रुपये शिल्लक राहतील, असा अंदाज बजेटमध्ये होता. वास्तववादी आणि कुठल्याही विकासकामांना थारा नसलेले हे बजेट २२५ कोटी रुपयांच्या शिल्लक कामांवर गदा आणणारे आहे, तर नवीन कामे जरी त्यात बळजबरीने घुसडली तरीही ती कामे पूर्ण होण्याची काहीही शाश्वती देता येणार नसल्याचे संकेत प्रशासनाने दिले. हे मनपाचे शेवटचे बजेट आहे. पुढच्या वर्षी मनपाच्या निवडणुका असल्यामुळे फेबु्रवारी २०१५ मध्ये फक्त लेखानुदान समोर येईल.