अर्थसंकल्पात कॅन्सरवरील औषधांची कस्टम ड्युटी कमी; मराठवाड्यातील हजारो रुग्णांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 07:36 PM2024-07-24T19:36:38+5:302024-07-24T19:37:17+5:30

औषधोपचाराचा खर्च होणार कमी, दरवर्षी मराठवाड्यातील जवळपास २ हजार कॅन्सर रुग्णांना फायदा होणार आहे.

Budget cuts custom duty on cancer drugs; Every year 2 thousand patients of Marathwada are benefited | अर्थसंकल्पात कॅन्सरवरील औषधांची कस्टम ड्युटी कमी; मराठवाड्यातील हजारो रुग्णांना फायदा

अर्थसंकल्पात कॅन्सरवरील औषधांची कस्टम ड्युटी कमी; मराठवाड्यातील हजारो रुग्णांना फायदा

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या ३ औषधांची कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे या औषधांच्या किमती कमी होतील, अशी घोषणा केली. यातून कॅन्सरवरील उपचाराचा भार कमी होणार असून, याचा दरवर्षी मराठवाड्यातील जवळपास २ हजार कॅन्सर रुग्णांना फायदा होणार आहे.

ट्रॅस्टुझुमॅब डेरुक्सटेकन, ओसिमेर्टीनिब आणि दुर्वालुमॅब या तीन कर्करोगाच्या औषधांना कस्टम ड्युटीमधून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. यात ट्रॅस्टुझुमॅब डेरुक्सटेकन हे एचईआर-२ पाॅझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरसाठी, ओसिमेर्टीनिब हे फुप्फुसाच्या कर्करोगासाठी आणि दुर्वालुमॅब हे औषध पित्ताशयाचा कर्करोग, फुप्फुसाचा कर्करोग, मूत्राशयाच्या कर्करोगात इम्युनोथेरपी म्हणून वापरतात, असे तज्ज्ञांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरातील एकट्या शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) वर्षभरात एचईआर-२ पाॅझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर, फुप्फुसाचा कर्करोग, पित्ताशय आणि मूत्राशयाच्या कर्करोगाचे साधारण ४०० ते ५०० रुग्ण येत असल्याचे डाॅ. बालाजी शेवाळकर यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅन्सरवर उपचार करणारी ५ ते ६ मोठी रुग्णालयेदेखील आहेत. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतही रुग्णालये आहेत. त्यामुळे ही तीन औषधी स्वस्त होण्याचा शेकडो कर्करुग्णांना फायदा होईल.
‘आयएमए’चे सचिव डाॅ. विकास देशमुख म्हणाले, कर्करोगाच्या औषधांसोबतच एक्स-रे मशीनसह अनेक वैद्यकीय उपकरणांवरील कस्टम ड्युटी कमी केली जाणार असल्याचे त्याचाही फायदा होईल.

Web Title: Budget cuts custom duty on cancer drugs; Every year 2 thousand patients of Marathwada are benefited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.