शहर पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिले ६८२ कोटींचे अंदाजपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 07:30 PM2019-02-19T19:30:35+5:302019-02-19T19:32:19+5:30
औरंगाबाद महापालिकेने २०११ मध्ये तयार केलेल्या समांतर जलवाहिनी योजनेचे काम बंद पाडले आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजीपी) औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ६८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. ते अंदाजपत्रक सोमवारी मराठवाडा विकास मंडळ अध्यक्ष आणि सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आले. सोबतच लातूर शहर पाणीपुरवठ्यासाठी ५८२ कोटी रुपयांतून जलवाहिनीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. हे दोन्ही अंदाजपत्रक घेऊन बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मराठवाडा विकास मंडळाची बैठक होईल, अशी माहिती अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिली.
औरंगाबाद महापालिकेने २०११ मध्ये तयार केलेल्या समांतर जलवाहिनी योजनेचे काम बंद पाडले आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाकडून अंदाजपत्रक तयार करून त्याआधारे योजना बनविण्यात यावी, असे मत मराठवाडा विकास मंडळाचे झाले. त्यानंतर प्राधिकरणाकडे अंदाजपत्रकासाठी विकास मंडळाने प्रस्ताव पाठविला. त्यानुसार ६८२ कोटी रुपयांतून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे अंदाजपत्रक एमजीपीने तयार केले आहे. दररोज पाणी देण्यासाठी तसेच पुढील २० वर्षांच्या नियोजनासाठी ती योजना असेल. एमजीपीने अंदाजपत्रक तयार केले आहे.
योजनेचा डीपीआर करण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करावी लागेल. लातूरसाठी उजनीतून पाणी देण्याची योजना राबविली, तर त्यासाठी ५८२ कोटी रुपये लागतील. मुख्यमंत्री आणि राज्यपालांची बुधवारी भेट घेऊन अर्थसंकल्पात दोन्ही योजनांसाठी तरतूद करण्याची मागणी असेल, असे डॉ. कराड यांनी स्पष्ट केले.
समांतरचे पॅकअप
समांतर जलवाहिनीचे पॅकअप झाले आहे. २०११ पासून योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेला निधी बँकेत पडून आहे. व्याजासह ती रक्कम ३५० कोटींच्या आसपास गेली आहे. राज्य शासनाने शहर पाणीपुरवठ्यासाठी एमजीपीच्या अंदाजपत्रकाचा विचार केला, तर मराठवाडा विकास मंडळाला नोडल एजन्सी नेमून एमजीपीमार्फत औरंगाबाद आणि लातूरसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय होऊ शकतो. मनपाला दिलेले अनुदान राज्य शासन सदरील योजनेमध्ये वळवू शकते. यासाठी केंद्र शासनासोबत राज्य शासनाने पत्रव्यवहार करून संमती घेतल्यास औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटणे शक्य होणार आहे.