औरंगाबाद जिल्ह्याचा ६३ कोटींचा टंचाई आराखडा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 08:09 PM2018-10-29T20:09:50+5:302018-10-29T20:10:41+5:30
जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाई तीव्र स्वरुपात जाणवू लागली आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाई तीव्र स्वरुपात जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने आॅक्टोबर ते डिसेंबर, असा तीन महिन्यांचा ६३ कोटी ३० लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. तथापि, या टंचाई आराखड्यात टँकर व विहीर अधिग्रहणाचा खर्च मात्र, जून २०१९ अखेरपर्यंतचा प्रस्तावित करण्यात आला आहे.
साधारणपणे पावसाळा अखेर आॅक्टोबरमध्ये टंचाई आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जातो. जिल्हा परिषदेमार्फत आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून, असा तीन- तीन महिन्यांचा टंचाई आराखडा तयार केला जातो. यंदा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे टंचाई आराखड्यात उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असलेल्या २४५ गावांमध्ये ५६४ विंधन विहिरी घेण्याचे प्राधान्याने सुचविलेले आहे. ज्यामुळे काहीअंशी का होईना या २४५ गावांतील नागरिकांची तहान भागेल. ३२ गावांमध्ये तात्पुरती नळ योजनांची कामे करणे, ८४ गावांमध्ये असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे सुचविण्यात आली आहेत. याशिवाय ९ गावांमध्ये असलेल्या विंधन विहिरींची दुरुस्तीही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या टंचाई आराखड्यामध्ये आॅक्टोबर ते जूनअखेरपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ५१० टँकर व ३८० विहिरींचे अधिग्रहण करावे लागेल, असे नमूद करण्यात आले असून, यासाठी जूनअखेरपर्यंत लागणाऱ्या निधीचीदेखील तरतूद करण्यात आली आहे.
पूर्वी तीन- तीन महिन्यांसाठी अपेक्षित टँकर व विहीर अधिग्रहणाची संख्या नमूद केली जात होती; परंतु अनेकदा मंजूर गावांपेक्षा टँकरची संख्या जास्त दिसत होती. त्यामुळे टंचाई आराखड्यात आॅक्टोबर ते जूनअखेरपर्यंत अपेक्षित टँकर व विहीर अधिग्रहण संख्या नमूद करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार नोंदी करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या गंगापूर, त्याखालोखाल पैठण व त्यानंतर वैजापूर या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई आहे. गंगापूर तालुक्यातील ७६ गावे, पैठण तालुक्यातील ४३ गावे, तर वैजापूर तालुक्यातील ४० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. कन्नड, खुलताबाद व सोयगाव या तीन तालुक्यांमध्ये मात्र, सध्या तरी पाणीटंचाई जाणवत नसल्यामुळे या तिन्ही तालुक्यांत सध्या टँकर सुरू नाहीत. असे असले तरी उर्वरित ६ तालुक्यांमध्ये २०४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, ११९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.