खैरेंची विकासकामे बोगसच; पण एसईच्या अहवालानंतर संबंधितांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:07 AM2017-07-31T01:07:01+5:302017-07-31T01:07:01+5:30
खा. चंद्रकांत खैरे यांच्या खासदार निधीतील कामे बोगस झाल्याच्या आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या तक्रारीत तथ्य आढळून येत असले तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांच्या अहवालानंतर संबंधितांवरची कारवाई अपेक्षित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : खा. चंद्रकांत खैरे यांच्या खासदार निधीतील कामे बोगस झाल्याच्या आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या तक्रारीत तथ्य आढळून येत असले तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांच्या अहवालानंतर संबंधितांवरची कारवाई अपेक्षित आहे. हे अधीक्षक अभियंता काय अहवाल देतात, किती दिवसांत देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
कन्नड तालुक्यातील देभेगाव व आलापूरमधील १५ पैकी ९ कामे झालीच नसल्याचे कन्नडचे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर यांनी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले की, चौकशी अहवालानुसार कामांमध्ये अनियमितता आढळून आलेली आहे. काही कामे झालेलीच नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकाºयांवर कारवाई केली जाईल. तसेच बांधकाम विभागाची जी कामे झाली नाहीत, त्याबाबत अधीक्षक अभियंत्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. तीन दिवसांत हा अहवाल यायला पाहिजे. त्यानंतर संबंधित विभागाच्या सचिवांनादेखील अहवाल पाठविला जाईल आणि दोषी अधिकाºयांवर कारवाई केली जाईल.
आ. हर्षवर्धन जाधव यांनी खा. चंद्रकांत खैरे यांच्यावर बोगस कामे केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी कन्नडच्या उपविभागीय अधिकाºयांमार्फत दोन गावांतील कामांची चौकशी करून घेतली. नुकताच चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आणि एकच खळबळ उडाली. देभेगावात तीन कामे झाली नसल्याचे उघड झाले. प्रत्येक कामात नमूद संरक्षक भिंत, पेव्हर ब्लॉक करण्यात आले नसल्याचे आढळून आले आहे.
देभेगावच्या जि. प. शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम १५ वर्षांपूर्वी झाले होते, असे मुख्याध्यापक व गावकºयांनी सांगितले. तेथील गुरुद्वारालगतच्या संरक्षक भिंतीचे काम गुरुद्वारा ट्रस्टमार्फत झाले. राजकीयदृष्ट्या या बोगस कामांच्या प्रकरणाला कसे वळण मिळते हे पाहणेही आता औत्सुक्याचे ठरणार आहे.