टीडीआर मिळणार असल्याचे सांगून बिल्डरची ५० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:28 PM2019-08-03T23:28:35+5:302019-08-03T23:29:10+5:30
औरंगाबाद : मंजूरपुरा येथील मालमत्तेचा टीडीआर मिळण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव दाखल केल्याचे सांगून शहरातील एका कुटुंबाने बिल्डरला तो टीडीआर विकून ...
औरंगाबाद : मंजूरपुरा येथील मालमत्तेचा टीडीआर मिळण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव दाखल केल्याचे सांगून शहरातील एका कुटुंबाने बिल्डरला तो टीडीआर विकून २५ लाख ५० हजारांचा गंडा घातल्याचे समोर आले. याविषयी सिटीचौक पोलिसांनी एमआयएमचा शहराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल साजीद, त्याचा भाऊ माजी नगरसेवक अब्दुल सिकंदर, अब्दुल सरफराज आणि दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, महापालिकेने रस्ता रुंदीकरण करताना मंजूरपुरा येथील अनेक मालमत्तेचे संपादन केले होते. दिवंगत अब्दुल साजीद बिल्डर यांनी त्यांच्या संपादित मालमत्तेचा मोबदला महापालिकेकडून घेतला होता. त्यांची मुले अब्दुल समीर, अब्दुल सिकंदर, अब्दुल सरफराज आणि अन्य दोन महिलांना ही बाब माहिती होती. तरीही या कुटुंबाने अब्दुल समीरच्या नावे या जागेसंबंधी व्यवहार करण्यासाठी आम मुख्त्यारनामा करून दिला. त्याआधारे समीरने मंजूरपुरा येथील संपादित जमिनीचा मावेजा म्हणून टीडीआर मिळावा, याकरिता महापालिकेत प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव शहरातील बांधकाम व्यावसायिक अश्विन नंदकुमार तांबी (रा. शिवशंकर कॉलनी) यांना दाखवून महापालिकेकडून मिळणारा टीडीआर त्यांना विक्री केला. ठरल्यानुसार अश्विन यांनी ३० आॅगस्ट २०१६ रोजी आरोपींना इसारा रक्कम म्हणून २५ लाख ५० हजार रुपये दिले. आरोपीच्या वडिलांनी मंजूरपुरा येथील संपादित जमिनीचा महापालिकेकडून मोबदला घेतलेला असल्याचे समोर आल्याने महापालिकेने अब्दुल समीरसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. हे समजताच अश्विन यांनी आरोपींना इसार म्हणून दिलेले २५ लाख ५० हजार रुपये परत मागितले. तीन वर्षांत आरोपींनी त्यांना पैसे परत केले नाही. एवढेच नव्हे तर त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. शेवटी अश्विन यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक डी. एस. सिनगारे हे तपास करीत आहेत.
चौकट
टीडीआर घोटाळ्यात हा चौथा गुन्हा
२०१६ साली उघडकीस आलेल्या महापालिकेच्या टीडीआर घोटाळ्यात आरोपींविरुद्ध सिटीचौक, जिन्सी ठाण्यात यापूर्वी ३ गुन्हे नोंद झाले होते. यापैकी २ गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने तर एका गुन्ह्याचा तपास जिन्सी पोलिसांनी केला. आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी अब्दुल समीरला अटक केली होती. आता २ आॅगस्ट रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्यात पुन्हा आरोपींवर अटकेची टांगती तलवार आहे.
----