बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून साडेचार लाख रुपये पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:35 PM2019-02-25T23:35:50+5:302019-02-25T23:36:19+5:30
बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून दुचाकीस्वार चोरट्यांनी साडेचार लाख रुपये पळविल्याची घटना कोकणवाडी चौकातील जय टॉवरसमोर सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. पैशाची बॅग पळविण्याच्या सलग घडणाऱ्या घटनांमुळे रोखीने व्यवहार करणाऱ्यांची चिंता वाढली आहे.
औरंगाबाद : बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून दुचाकीस्वार चोरट्यांनी साडेचार लाख रुपये पळविल्याची घटना कोकणवाडी चौकातील जय टॉवरसमोर सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. पैशाची बॅग पळविण्याच्या सलग घडणाऱ्या घटनांमुळे रोखीने व्यवहार करणाऱ्यांची चिंता वाढली आहे.
गारखेडा परिसरातील परिमल हौसिंग सोसायटीतील रहिवासी निवृत्ती लक्ष्मणराव सूर्यवंशी यांचे कोकणवाडीतील जय टॉवर येथे सूर्यवंशी इंजिनिअर्स आणि मुलाचे साकेत बिल्डर्स या नावाने कार्यालय आहे. सोमवारी त्यांना मजुरांचे पेमेंट करायचे होते. त्यांनी त्यांचे बांधकाम व्यावसायिक मित्र सचिन कासलीवाल (रा. रामकृष्णनगर, गारखेडा) यांच्यासोबत सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शास्त्रीनगर येथील भारतीय स्टेट बँकेत कारने (एमएच-२० सीएच ४४०४) गेले. तेथे त्यांनी बँकेतून रोख ४ लाख ५५ हजार रुपये काढले आणि ते कारने आकाशवाणी, क्रांतीचौक मार्गे कोकणवाडी येथील जय टॉवर येथे आले. कासलीवाल यांना जेवण करण्यासाठी घरी जायचे असल्याचे त्यांनी सूर्यवंशी यांना सांगितले. तेव्हा दहा मिनिटांत कार्यालयातील काम आटोपून आपण सोबतच गारखेड्यात जाऊ असे सूर्यवंशी म्हणाले. त्यांनी ४ लाख ५५ हजार रुपयांपैकी पाच हजार रुपये खिशात काढून ठेवले आणि उर्वरित साडेचार लाख कारच्या समोरच्या दोन्ही सीटमध्ये ठेवून कार लॉक करून ते दोघे कार्यालयात गेले. त्यानंतर पाच ते सात मिनिटांनी एका तरुणाने कारची काच फोडली व पैसे चोरून साथीदारासह दुचाकीवर बसून पळून गेला.
शेजारील कारचालकाने केला पाठलाग
कासलीवाल यांच्या कारशेजारी कॉन्ट्रॅॅक्टर हेमंत खेडकर यांची कार उभी होती. या कारमध्ये खेडकर यांचा चालक संदीप पवार मोबाईलवर गेम खेळत बसला होता. शेजारील कारची काच फुटल्याचा आवाज त्याला आला. तेव्हा एक तरुण कारजवळ उभा दिसला. तो त्या कारचा चालक असावा,असे वाटल्याने पवार पुन्हा मोबाईलवर गेम खेळू लागला. त्या तरुणाने कारमधून पैशाची बंडले काढून शर्टमध्ये टाकत पळ काढल्याचे पवारला दिसले. त्यामुळे पवार त्याला पकडण्यासाठी पळाला. तेव्हा चोरटा खाली पडला आणि पुन्हा उठून साथीदाराच्या दुचाकीवर बसून सुसाट निघून गेला.
गुन्हे शाखेकडून सीसीटीव्हीची तपासणी
शास्त्रीनगर येथील एसबीआय बँकेपासूनच चोरट्यांनी सूर्यवंशी आणि कासलीवाल यांच्यावर पाळत ठेवली असावी, असा पोलिसांना संशय आहे. घटनेची माहिती कळल्यानंतर उपायुक्त डॉ. निकेश खाटमोडे पाटील, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, वेदांतनगर ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, राहुल सूर्यकांत, उपनिरीक्षक विजय पवार, उपनिरीक्षक शेख अफरोज आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांनी वापरलेल्या मोटारसायकलचा क्रमांक पोलिसांना मिळाला असून, शास्त्रीनगर बँक ते कोकणवाडी जय टॉवरपर्यंतच्या सीसीटीव्हीची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.