बांधकाम अभियंत्याचे घोटाळेबाजांना अभय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:27 AM2017-10-29T00:27:30+5:302017-10-29T00:27:40+5:30
बीड नगरपालिकेतील रमाई घरकुल आवास योजनेचे अनुदान लाटणा-या १९ लाभार्थ्यांना पालिकेचे बांधकाम अभियंताच अभय देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड नगरपालिकेतील रमाई घरकुल आवास योजनेचे अनुदान लाटणा-या १९ लाभार्थ्यांना पालिकेचे बांधकाम अभियंताच अभय देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घोटाळ्यामध्ये टक्केवारीप्रमाणे अभियंत्यांनीही वसुली केल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांसह बांधकाम अभियंताही संशयाच्या भोव-यात सापडला असून, चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने २ मार्च २०१० पासून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. बीड नगरपालिकेत २०१२ पासून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली. ५ वर्षांत ५१७ घरकुल मंजूर झाले. परंतु यातील १९ लाभार्थ्यांनी बनावट पीटीआर, उत्पन्न, जातीचा दाखला आदी महत्वाची कागदपत्रे सादर करुन लाभास पात्र असल्याचे सांगत पालिकेची फसवणूक केली. त्यानंतर मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांनी अनुदान लाटणा-यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे बांधकाम अभियंत्यांनी यादी तयार केली, पोलीस ठाण्यातही गेले, परंतु गुन्हा दाखल न करता रिकाम्या हाताने परतले. केवळ देखावा करण्यासाठी अभियंता हे ठाण्यात गेल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. यावरुन अभियंत्यांच्या या संशयास्पद कामगिरीमुळे घोटाळेबाजांना त्यांचेच अभय असल्याचे बोलले जात आहे.
मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला, मात्र ते आजारी असल्याने प्रतिक्रिया देऊ शकले नाहीत.