बुलेट ट्रेनने येणार गंगापूर तालुक्याला ‘समृद्धी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:02 AM2021-08-01T04:02:02+5:302021-08-01T04:02:02+5:30
जयेश निरपळ गंगापूर : केंद्राच्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनतर्फे देशातील मेट्रो शहरांना बुलेट ट्रेनने जोडण्यात येणाऱ्या प्रस्तावित ८ बुलेट ...
जयेश निरपळ
गंगापूर : केंद्राच्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनतर्फे देशातील मेट्रो शहरांना बुलेट ट्रेनने जोडण्यात येणाऱ्या प्रस्तावित ८ बुलेट ट्रेन कॉरिडॉर प्रकल्पात नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ६० गावांतून प्रस्तावित ट्रेन धावणार आहे. यात गंगापूर तालुक्यातील ११ गावांचा समावेश असून यामुळे अनेक शेतकरी मालामाल होणार आहेत. शिवाय तालुक्यात स्टेशन होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसे झाल्यास तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
प्रस्तावित ७३६ किमोमीटरच्या या मार्गाचा नकाशा लाईट डिटेक्शन रेजिंग (लिडार) तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बुलेट ट्रेनचा हा मार्ग समृद्धी महामार्गाच्या शेजारी असणार आहे. अशाप्रकारचा सलगपणे लगत असणारा हा देशातील पहिलाच मार्ग ठरणार आहे. भूसंपादन करण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरू झाले असून महामार्गातील पिके, फळबागा आणि तलावाचा नोंदीसह सर्वच बाबीसुद्धा या सर्वेक्षणात घेण्यात येणार आहेत.
ताशी ३५० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या प्रस्तावित मार्गावर १२ स्टेशन असणार आहेत. त्यात जालना-औरंगाबादचा समावेश असून तांत्रिकदृष्ट्या दोन्ही स्टेशनमधील कमी अंतर व जास्त वेगाचा विचार करता तसेच पर्यटन, व्यापार औद्योगिक दळणवळण लक्षात घेऊन हे स्टेशन तालुक्यातील लासूरच्या आसपास असण्याची शक्यता आहे. यामुळे गंगापूर तालुक्यासह खुलताबाद, औरंगाबाद तालुक्यातील विकासाला व पर्यटनाला चालना मिळणार आहे.
या अकरा गावातील जमिनी होतील संपादित
तालुक्यातील टाकळी, डोणगाव, फतियाबाद, तळेसमान, गिरनेरा, पेकळेवाडी, धामोरी खुर्द, टाकळेवाडी, इस्लामपूर, नांगरे बाभूळगाव, अनंतपूर (लासुर) या अकरा गावातील जमिनी समृद्धीप्रमाणे संपादित करण्यात येणार आहेत.
कही खुशी कही गम..!
कमी उत्पादन क्षमता व खडकाळ जमिनीला यानिमित्ताने चांगला भाव मिळणार असल्याने अनेक शेतकरी आनंदीत झाले आहेत. तर भूसंपादनामुळे एकाच क्षेत्राचे दोन भाग होणार असल्याने काही शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोट
वाळूज औद्योगिक वसाहतीचा प्रस्तावित विस्तार व खुलताबाद, वेरूळ, परिसरातील पर्यटन लक्षात घेता हे स्टेशन लासूरच्या जवळ घेण्यासाठी यापूर्वीच मागणी केली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मराठवाड्याचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करणार आहोत.
- प्रशांत बंब, आमदार गंगापूर-खुलताबाद.