एमआयडीसीत गुंडगिरी वाढली; कंत्राट देण्याच्या कारणावरून व्यवस्थापकाला रस्त्यात अडवून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 04:21 PM2021-08-11T16:21:31+5:302021-08-11T16:31:04+5:30
Bullying increased in MIDC area of Aurangabad : टोळके व्यवस्थापकास बेदम मारहाण करुन घटनास्थळावरुन पसार झाले.
वाळूज महानगर : औद्योगिक परिसरात गुंड व ब्लॅकमेल करणाऱ्यांची दहशत वाढतच चालली आहे. भोगले कंपनीत कामगार आणि व्यवस्थापकातील वादाची घटना ताजी असताना आता एका कंपनीच्या एचआर व्यवस्थापकाला रस्त्यात अडवुन १० ते १५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवार (दि.१०) सांयकाळी ७ वाजेच्या सुमारास वाळूज उद्योगनगरीत ( Waluj MIDC ) घडली. या मारहाणीत शिरीषकुमार राजेभोसले (३९ रा.नक्षत्रवाडी) हे जखमी झाले आहे. कंपनीत कामगार पुरविण्याचा ठेका देण्याच्या कारणावरुन ही मारहाण झाल्याचा आरोप जखमी व्यवस्थापक भोसले यांनी केला आहे.
हेही वाचा - उद्योगनगरीत गुंड, 'ब्लॅकमेलर' रोखा; वाळूज एमआयडीसीतील उद्योजकांची प्रशासनाकडे मागणी
या विषयी अधिक माहिती अशी की, वाळूज एमआयडीसीतील जोगेश्वरी शिवारात असलेल्या श्रीगणेश कोटींग या कंपनीत शिरीषकुमार राजेभोसले (रा.नक्षत्रवाडी ता.जि.औरंगाबाद) हे एचआर व्यवस्थापक म्हणून काम करतात. मंगळवार (दि.१०) सांयकाळी कंपनीतील कामकाज आटोपल्यानंतर दुचाकीवरून नक्षत्रवाडी येथील घराकडे निघाले होते. काही अंतरावर एम-सेक्टरजवळ दुचाकीवरुन आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने राजेभोसले यांना अडवले. दुचाकी अडवून त्यांच्याशी वाद घालत लाठ्या-काठ्याने मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे राजेभोसले यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा करण्यास सुरवात केली. यावेळी टोळके राजेभोसले यांना बेदम मारहाण करुन घटनास्थळावरुन पसार झाले. या मारहाणीत राजेभोसले यांचा डावा हात फॅक्चर झाला आहे. डोळ्याजवळ ठोसे लगावल्याने मोठी जखम झाली असून सुदैवाने डोळा बचावला आहे. याशिवाय मुकामार लागल्याचे राजेभोसले यांनी सांगितले.
ठेका देण्याच्या कारणावरुन धमक्या
श्री गणेश कोटींग या कंपनीत जवळपास ३०० ते ४०० कामगार काम करतात. या कंपनीत कंत्राटी कामगार पुरविण्याचा ठेका आम्हाला द्या, या कारणावरुन विविध पक्षाच्या कार्यकर्त्याकडून धमक्या दिल्या जात असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले. आम्हाला काम न दिल्यास गंभीर परिणाम होतील अशा धमक्या राजेभोसले यांना दिल्या जात होत्या. आपले कुणासोबत वैर नसतांना अनोळखी व्यक्तीने मारहाण केल्याने वरिष्ठांशी चर्चा करुन पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले.