औरंगाबादला मंत्रीपदांची बंपर लॉटरी? शिंदे गटांच्या ५ तर भाजपाच्या तीन आमदारांची दावेदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 07:20 PM2022-07-01T19:20:35+5:302022-07-01T19:21:55+5:30
जिल्ह्याला मिळणार नवीन पालकमंत्री, मंत्रीपदी कोणाला मिळणार संधी याचीच चर्चा
औरंगाबाद: शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले व बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज्याचा कारभार आता नव्याने सुरू होणार आहे. शिंदेंच्या बंडाला बंपर पाठिंबा शिवसेनेचा कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याने दिला. जिल्ह्यातील दोन मंत्र्यांसह पाच आमदार या बंडात सामील असल्यामुळे औरंगाबादला मंत्रीपदाची बंपर लॉटरी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आ. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने यांच्यासोबत गेलेल्या सर्वच मंत्र्यांची पदे तशीच राहण्याची शक्यता अधिक आहे. आ. संदीपान भुमरे, आ. अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदे कायम राहून आ. संजय शिरसाट यांना एखादे खाते मिळू शकते. तर आ. अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब यांना मंत्रिपदे मिळतील असा आत्मविश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. २०१९ मध्ये अवघ्या चार महिन्यांसाठी आ. सावे हे उद्याेग राज्यमंत्री राहिले होते. विधानसभेनंतर कॅबिनेट होण्याची त्यांची संधी हुकली होती, ती आता पूर्ण होऊ शकते. महाविकास आघाडी सरकारमध्ये भुमरे कॅबिनेट तर सत्तर राज्यमंत्री होते. शिंदे यांच्या बंडात अधिकाधिक आमदारांना सहभागी करून घेण्यात औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांची भूमिका महत्वाची होती. शिवाय तिसऱ्यांदा आमदार होऊनही मंत्रिपद न मिळाल्याने शिरसाट नाराज होते, अशी प्रशिपासूनच चर्चा होतीच. त्यामुळे शिरसाट यांच्या रूपाने तिसरे मंत्रिपद मिळू शकते. भाजपच्या कोट्यातून आणखी कोणाला मंत्रिपदे मिळतात यावर जिल्ह्यास किती मंत्रिपदे मिळतील, ते अवलंबून आहे.
एका तपात झालेले पालकमंत्री असे
२०११ ते २०१४ पर्यंत बाळासाहेब थोरात यांच्याकडे पालकमंत्री पद होते. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये रामदास कदम यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि कदम यांच्यातील गटबाजीमुळे डॉ. दीपक सावंत यांना पालकमंत्री करण्यात आले. सावंत यांचा कार्यकाल संपल्यानंतर सहा महिन्यांसाठी आ. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री राहिले. डिसेंबर २०१९ पासून २९ जूनपर्यंत सुभाष देसाई हे पालकमंत्री होते.
बाहेरचेच पालकमंत्री लाभले
आजवर जिल्ह्याला बाहेरचेच पालकमंत्री लाभलेले आहेत. मागील २५ वर्षांत चंद्रकांत खैरेवगळता सर्व पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्यातील राहिले. त्यामुळे औरंगाबादला राज्याच्या ‘टॉप टेन’ शहरात आणण्याच्या घोषणेला कुणीही पूर्ण करू शकले नाही. मागील १२ वर्षांत मुंबईतील चार पालकमंत्री जिल्ह्याला मिळाले. बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्यातील होते.