‘माणुसकीची भिंत’ ला उदंड प्रतिसाद
By Admin | Published: November 13, 2016 12:32 AM2016-11-13T00:32:41+5:302016-11-13T00:32:16+5:30
जालना : जालना जिल्हा नव्हेतर मराठवाड्यात प्रथमच ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला जालना शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जालना : जालना जिल्हा नव्हेतर मराठवाड्यात प्रथमच ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला जालना शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसीय उपक्रमाच्या पहिल्या दिवशी शहरातून फेरी काढून उपक्रमाची माहिती देण्यासोबतच अनेकांनी गरजूंसाठी कपडेही दिले.
जालना शहरातील अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वापरण्यायोग्य असे २००० पेक्षा जास्त व्यक्तींचे समाज ऋण रथामध्ये कपडे जमा केले. तसेच गांधी चमन व शिवाजी पुतळा येथे स्वत: येऊन गरजू लोकांना स्वत:च्या हाताने कपडे दिले. या प्रकारचे उपक्रम प्रथम जिल्ह्यात आयोजित झाल्यामुळे सर्व नागरिकांत कुतुहल आहे. तर काही ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाची प्रशंसा सुद्धा दिली.
काळ्या पैशाची सर्जिकल स्ट्राईक, निवडणुकीचे गरम वातावरण असताना मराठवाड्यात थंडीची चाहूल लागत आहे. मागच्या चार - पाच दिवसांत तापमानाचा पारा झपाट्याने खाली गेला आहे. यामुळे सर्वजण थंडीपासून बचावासाठीचे तऱ्हेतऱ्हेचे उबदार कपडे खरेदी करतो. मात्र ज्यांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत व अंगभर घालायला कपडे नसलेले कितीतही गरजवंत रस्त्यावर इतरत्र झोपलेले आपल्या निदर्शनास येतात. यांच्यासाठीच स्वराज्य फाऊंडेशन हा उपक्रम सुरू केला आहे. हे उबदार जुने कपडे, चप्पल सोबतच उपयुक्त जीवनावश्यक साहित्य गोळा करण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम जालना शहरात प्रथमच शिवाजी पुतळा व गांधी चमन याठिकाणी १२, १३ व १४ नोव्हेंबर या तीन दिवस राबवत आहे. या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी जालनेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
जवळपास या माणुसकीच्या भिंतीला पहिल्या दिवशी २००० पेक्षाही जास्त व्यक्तींनी दोन्हीही ठिकाणी भेट देऊन वापरण्यायोग्य स्वेटर, उबदार, जुने कपडे दिले व फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.विजय सुरासे, विद्यार्थी स्वयंसेवकाचे कौतुक केले.
गांधी चमन येथील सकाळी सर्व प्रथम संजय कायंदे, रुपाबाई देवकर, लक्ष्मणराव काळे, रमेश वाघमारे, शेख मोबिन शेख प्यारे व शिवाजी पुतळा येथील सकाळी सर्वप्रथम अभिषेक भराडे, रवींद्र कातकर, रोहित परळकर, वैभव लोखंडे, शीला गुळावकर या सदगृहस्थांनी उपयोगी कपडे भेट देऊन गरजवंताची गरज भागवली.
माणुसकीची भिंत उपक्रमातील स्वयंसेवक गणेश दाभाडे, शैलेश चव्हाण, प्रियंका माकू, हर्षदा खरात, सीमा गायकवाड, तेजस्विनी इंचे, अस्लम शेख, हर्षवर्धन पाटील, गणेश नेमाने, गोपाल तौर, ऋषिकेश जिरेकर, सिद्धेश्वर खांडेकर गोपाल पेंढारकर, दीपक पाठक, योगेश लवटे, रवींद्र गरंडवाल, निलेश कानडे यांनी सकाळ पासून सायंकाळपर्यंत परिश्रम घेतल्याचे स्वराज्य फाऊंडेशनचे प्रा. विजय सुरासे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)