वर्षभर हॉटेलात राहून ७ लाखांचे बिल न देताच बंटी आणि बबली पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 12:22 PM2021-06-24T12:22:49+5:302021-06-24T12:26:12+5:30
Crime news in Aurangabad विश्वजित दत्ता आणि शुभांगी दत्ता (सातारा परिसर) अशी आरोपींची नावे आहेत.
औरंगाबाद : सुमारे वर्षभर हॉटेलमध्ये मुक्काम करून एका दाम्पत्याने सिडकोतील एन ५ मधील हॉटेलचे ७ लाख ४१ हजार रुपयांचे बिल थकवून पलायन केल्याचे समोर आले आहे. बिलापोटी या दाम्पत्याने दिलेले चेकही वठले नाहीत. याप्रकरणी सिडको ठाण्यात या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
विश्वजित दत्ता आणि शुभांगी दत्ता (सातारा परिसर) अशी आरोपींची नावे आहेत. १६ जून २०२० रोजी आरोपी दाम्पत्य एन ५ येथील हॉटेल द लिफमध्ये रूम करून राहण्यास आले. या दाम्पत्याने आधी १६ हजार रुपये आगाऊ रक्कम जमा केली. त्यानंतर ते वर्षभर या हॉटेलमध्ये राहिले. हॉटेल व्यवस्थापक ज्ञानेश्वर सदाशिव पुरी (३९, रा. एन ५, सिडको) यांनी बिल भरण्यास सांगितले असता, लॉकडाऊन, कोरोना अशी वेगवेगळी कारणे सांगून बिल देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. ५ नोव्हेंबर २०२० रोजी दत्ता यांची पत्नी शुभांगी यांच्या बँक खात्याचा १ लाख रुपये रकमेचा चेक दिला. पण हा चेक वठला नाही. त्यामुळे व्यवस्थापकाने या दाम्पत्याला रूम रिकामी करण्यास सांगितले. मात्र ते गेले नाहीत. त्यांनी ११ नोव्हेंबर २०२० रोजी १ लाख ८५ हजार रुपयांचा दिलेला दुसरा चेकही वठला नाही.
यानंतर विश्वजित याने २६ नोव्हेंबर २०२० रोजी आणि १४ जानेवारी २०२१ रोजी ४ लाख ४८ हजार रुपयांचे दोन वेगवेगळे चेक हॉटेलला दिले. हे चेकही वठले नाहीत. काही दिवसांनी, तुमचे पैसे आणून देतो, असे सांगून विश्वजित हॉटेलमधून बाहेर पडला. तसेच ३ जून २०२१ रोजी हॉटेल व्यवस्थापनाला न कळविता शुभांगीने हॉटेल सोडले. त्यावेळी त्यांचे हॉटेलचे एकूण बिल ७ लाख ४१ हजार २१६ रुपये झाले होते. या दाम्पत्याने आपला विश्वासघात केल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. यानंतर पुरी यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नाेंदविला असून पोलीस हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.
दाम्पत्य औरंगाबादमधीलच
विशेष म्हणजे पलायन केलेले दाम्पत्य औरंगाबादच्या सातारा परिसरातीलच आहे. हॉटेलच्या रजिस्टरमध्ये या दाम्पत्याने वेगवेगळे पत्ते दिले आहेत. विश्वजित दत्ता याने त्याचा पत्ता शिवशंकर दत्ता, हाऊस नं. १२८५ - ३१, आयआरबी रोड, झांबड इस्टेटजवळ सातारा परिसर, औरंगाबाद असा दिला आहे, तर त्याची पत्नी शुभांगी मगरे (दत्ता) हिने तिचा पत्ता सुधाकरनगर, सातारा परिसर असा दिला आहे. औरंगाबाद शहरातीलच हे दाम्पत्य असताना ते वर्षभर हॉटेलमध्ये का राहिले, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.