चोरीच्या ‘स्टाईल’वरून घरफोड्यांचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:55 AM2017-09-20T00:55:55+5:302017-09-20T00:55:55+5:30
प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल असते. अशीच काहीशी स्टाईल चोरांचीही असते. याच स्टाईलवरून दोन दिवसांपूर्वी बीडमधील बलभीम चौकात झालेल्या दोन घरफोड्यांचा तपास पोलिसांनी लावला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल असते. अशीच काहीशी स्टाईल चोरांचीही असते. याच स्टाईलवरून दोन दिवसांपूर्वी बीडमधील बलभीम चौकात झालेल्या दोन घरफोड्यांचा तपास पोलिसांनी लावला आहे. लंगडा लाला व कल्लू अशा दोन सराईत चोरांनीच ही घरफोडी केल्याचे उघड झाले असून त्यांच्याकडून काही साहित्य जप्त केले आहे.
पत्रकार मुजीब शेख व निवृत्त पोलीस अधिकारी विनायक गुळवळकर यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी रात्री चोरी झाली होती. यामध्ये लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला होता. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकाला पाचारण केले होते. परंतु हाती काहीच लागले नाही. घटनास्थळावरून ठोस असे पुरावे हाती न लागल्याने हा तपाास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांचे वेगवेगळे पथके नियुक्त केली. स्थागुशाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सराईत गुन्हेगारांसह रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले. यामध्ये त्यांना अनेकांवर संशय आला. परंतु लाला लंगडा याच्याबद्दल त्यांचा संशय अधिक बळावला. पत्रकार व पोलीस अधिकाºयाची घरी झालेली चोरी ज्या पद्धतीने झाली होती, त्याचा अभ्यास केला. टॉमीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केल्याचे समोर आले होते. अशा चोºया करण्यात लाला पटाईत असल्याचे पोलिसांना माहिती होते. त्यांनी लगेच लालाच्या घराची झडती घेतली. यामध्ये पोलिसांना बºयाच वस्तू व साहित्य संशयास्पद आढळले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. लाला याला बार्शी नाका परिसरातून बेड्या ठोकल्या तर कल्लूला पेठबीड भागात पकडले. दोघांनाही खाक्या दाखविताच ते पोपटासारखे बोलू लागले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि दिनेश आहेर, सय्यद सुलेमान यांच्यासह त्यांच्या कर्मचाºयांनी केली.