घरफोडीतील अट्टल गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:58 AM2017-07-21T00:58:24+5:302017-07-21T00:59:51+5:30
बीड : घरफोड्यातील अट्टल गुन्हेगार असलेल्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : घरफोड्यातील अट्टल गुन्हेगार असलेल्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे जेरबंद केलेले दोन्ही आरोपी हद्दपार झालेले आहेत.
शेख अशफाक शेख असीफ (३५) व आगा मिर्खा ऊर्फ लंगडा लाला जहांगीरखान पठाण (३५) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी टोळीचा म्होरक्या शेख अशफाकला वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते, तरीही अशफाक, लंगडा लाला हे दोघे आपल्या साथीदारांसह बीड जिल्ह्यात येऊन घरफोड्या करीत होते. १४ जुलै रोजी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना खबऱ्यामार्फत हे दोघे बीडमध्ये असल्याच माहिती मिळाली. सापळा रचून दोघांच्याही मुसक्या आवळल्या.
सुरुवातीला या दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली नाही; परंतु पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच दोघेही पोपटासारखे बोलू लागले. त्यांनी बीड, अंबाजोगाई येथे घरफोड्या केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून १७३ ग्रॅम सोने, १५ हजार रुपये रोख रक्कम व १० ब्रिस्टॉल पाकीट असा ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश आहेर, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्यासह तुळशीराम जगताप, मुंजाबा कुव्हारे, सखाराम सारूख, नरेंद्र बांगर, मनोज वाघ, बालाजी दराडे, प्रसाद कदम, सतीश कातखडे, विष्णू चव्हाण, कोरडे, संतोष मेहेत्रे आदींनी केली.