घरफोडी करणारी टोळी अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:46 AM2017-08-19T00:46:46+5:302017-08-19T00:46:46+5:30
औरंगाबाद ग्रामीण भागात घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून, त्यांच्याकडून मोबाइल, सोन्याचे दागिने असा ४ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबाद ग्रामीण भागात घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून, त्यांच्याकडून मोबाइल, सोन्याचे दागिने असा ४ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
देवगाव रंगारी येथील शकील अब्दुल करीम मनियार (३७) यांच्या घराच्या मागील दरवाजा तोडून त्यातून चोरट्यांनी प्रवेश करून ५ लाख ७४ हजार ९५६ रुपयांचा माल चोरून नेला होता. रोख रक्कम, मोबाइल, सोन्याचे दागिने इत्यादी चोरी झाल्याचे देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. गुन्ह्यातील गेलेला माल व चोरट्यांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. बातमीदारांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तपासाची चक्रे फिरविली असता मनोज भास्कर कदम (२६, रा. देवगाव रंगारी) यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले व त्याचे अन्य साथीदार सतीश लक्ष्मण पोपळघट (२४), विनोद ऊर्फ बंटी राजू कदम, मंगेश गौतम (सर्व रा. देवगावरंगारी), मनीष तुकाराम सोनवणे (२१, रा. राजकरनगर, धुळे) यांनी मिळून ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर, पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, पोहेकॉ रतन वारे, पोलीस नाईक किरण गोरे, आशिष जमधडे, सागर पाटील, योगेश तरमाळे, शेख अबुबकर यांच्या पथकाने आरोपी मनोज कदम, सतीश पोपळघट, मनीष सोनवणे या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यातील १९ मोबाइल, सोन्याचे दागिने असा एकूण ४,५०,००० किमतीचा ऐवज पोलिसांना दिला. इतर ऐवज व दोन आरोपी अद्याप पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे.