वाळूज महानगरात चोऱ्यांचे सत्र सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:07 PM2019-07-30T23:07:23+5:302019-07-30T23:07:34+5:30
बजाजनगरातील महारुद्र हनुमान मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी पळविल्याची घटना पुन्हा घडली आहे.
भितीचे वातावरण : बजाजनगरातील मंदिरातून दानपेटी पळविली
वाळूज महानगर : वाळूज महानगरात चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. बजाजनगरातील महारुद्र हनुमान मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी पळविल्याची घटना पुन्हा घडली आहे. या घटनेतील संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. काही दिवसांच्या अंतराने सतत चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
बजाजनगर येथे तानाजी नगरात महारुद्र हनुमान मंदिर आहे. एकादशी निमित्त रविवारी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत मंदिरात भजनाचा कार्यक्रम सुरु होता. त्यानंतर सर्व मंडळी घरी गेली.
मंदिरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी लाईट बंद करुन मंदिराच्या गाभाºयासमोर ठेवलेली जवळपास ५० किलो वजनाची लोखंडी दानपेटी लंपास केली. दरम्यान, मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास शेजारील आदित्य नांदे हा लघशंकेसाठी उठला असता त्याला मंदिरातील लाईट बंद दिसली.
आदित्यने ही माहिती वडिल बाजीराव नांदे यांना दिली. बाजीराव नांदे यांच्या मनात संशय आल्याने त्यांनी मंदिरात जाऊन पाहाणी केली असता मंदिरातील दानपेटी गायब असल्याचे दिसून आले. यापूर्वीही ही दानपेटी दोनवेळा चोरट्यांनी फोडून आतील रक्कम लंपास केली होती. या दानपेटीत जवळपास १५ हजार रुपये असावेत, असा अंदाज येथील नागरिकांनी व्यक्त केला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे पोलीसांनी सांगितले.
संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैद
हनुमान मंदिरातील दानपेटी चोरी झाल्याच्या वेळेत एक महिला व अन्य एक व्यक्ती असे दोघेजण मंदिराच्या दिशेने जात असताना मंदिरासमोरील एका झेरॉक्स दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सदर व्यक्तीच्या हातात लोखंडी रॉडअसल्याचे दिसून येत आहे.