वेदांतनगरमध्ये घरफोडी; सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख रुपयांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:04 AM2021-07-20T04:04:41+5:302021-07-20T04:04:41+5:30
औरंगाबाद : उच्चभ्रू वस्ती असलेल्या वेदांतनगरमधील एका अपार्टमेंटमध्ये घुसून चाेरट्यांनी घरफोडी करीत ६२ ग्रॅम डायमंड, सोन्याचे दागिने आणि पाच ...
औरंगाबाद : उच्चभ्रू वस्ती असलेल्या वेदांतनगरमधील एका अपार्टमेंटमध्ये घुसून चाेरट्यांनी घरफोडी करीत ६२ ग्रॅम डायमंड, सोन्याचे दागिने आणि पाच हजार रुपये रोख असा एकूण चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वेदांतनगर परिसरात मनीष अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये रात्री चोरटे घुसले. त्यांनी फ्लॅट क्रमांक एक, दोन आणि तीन हे सलग फोडले. यातील फ्लॅट क्रमांक एक आणि तीन रिकामे असल्याने चोरट्यांना काहीही हाती लागले नाही. मात्र, निरुपमा शिवप्रकाश मुदीराज (६५) यांचा फ्लॅट क्रमांक दोन हा चार जुलैपासून बंद होता. त्या कामानिमित्त मुलींसह पुण्याला गेल्या होत्या. घरात कोणीही नसल्याची संधी साधून कुलूप तोडून चोरटे आत घुसले. त्यांनी कपाटासह विविध ठिकाणाहून चेन, ब्रेसलेट आणि अंगठ्या असा सोन्याचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी एकूण ३ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
रविवारी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती निरुपमा मुदिराज यांना दिली. तात्काळ त्यांनी घटनेची माहिती वेदांतनगर पोलिसांना दिली. यावरून पोलीस निरीक्षक परमेश्वर रोडगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सायंकाळी त्यांची मुलगी धनश्री मोदिराज (३५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
चौकट...
वेदांतनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे. घटनास्थळाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही भेट दिली.