आगीत कापसाच्या गाठी जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:04 AM2021-05-23T04:04:22+5:302021-05-23T04:04:22+5:30
गंगापूर : औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावरील गंगापूर फाट्यावरील तीन वेअर हाऊसमध्ये शनिवारी पहाटे आग लागली. यात व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या कापसाच्या ...
गंगापूर : औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावरील गंगापूर फाट्यावरील तीन वेअर हाऊसमध्ये शनिवारी पहाटे आग लागली. यात व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या कापसाच्या गाठी आगीत जळून भस्मसात झाल्या असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील भेंडाळा-पिंपळवाडीच्या गट क्रमांक १८मध्ये सुनील रुपचंद आढागळे व संतोष रुपचंद आढागळे यांनी आपल्या मालकीचे गोडावून एका वेअर हाऊस कंपनीला भाडेतत्वावर दिले होते. या गोडावूनमध्ये व्यापाऱ्यांनी कापसाच्या गाठी साठवून ठेवल्या होत्या. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास गोडावूनला आग लागली. ही बाब लक्षात येताच आग आटोक्यात आणण्यासाठी गरवारे कंपनी व औरंगाबाद मनपाच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले.
हे गोडावून शेतशिवारात असल्याने व एक गाडी चिखलात फसल्याने आग शमविण्यास अडचण येत होती. या दुर्घटनेच्या सव्वीस तासांनंतरही गोडावूनमध्ये आग धगधगत होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोडावूनमध्ये असलेल्या कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत. या आगीचे नेमके कारण समजले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी दलाचे जवान सोमनाथ सावळे, भरत वाघ, विशाल सांगळे, विनायक तिमकर, विक्रम भुईगळ आदींनी प्रयत्न केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शकील शेख, गोपनीय शाखेचे योगेश हरणे हे करत आहेत.