साजापूर रोडवर बर्निंग कार; दोघे भाऊ बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 03:00 PM2018-01-06T15:00:58+5:302018-01-06T15:02:08+5:30
साजापूरहून औरंगाबादकडे जात असताना चालत्या कारला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साजापूरजवळ घडली. या आगीच्या घटनेत कार भस्मसात झाली असून, नशीब बलवत्तर असल्यामुळे या कारमधील दोघे भाऊ बालंबाल बचावले.
वाळूज महानगर (औरंगाबाद ) : साजापूरहून औरंगाबादकडे जात असताना चालत्या कारला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साजापूरजवळ घडली. या आगीच्या घटनेत कार भस्मसात झाली असून, नशीब बलवत्तर असल्यामुळे या कारमधील दोघे भाऊ बालंबाल बचावले.
या विषयी अधिक माहिती अशी की, शेख फहीम हुसैन (रा. न्यू बायजीपुरा, औरंगाबाद) यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. आज शुक्रवारी दुपारी शेख फहीम हे कार क्रमांक एम.एच.२०, ई.ई.५१२५ घेऊन साजापुरातील वीटभट्टीवर आले होते. या वीटभट्टीवर काही काळ थांबल्यानंतर शेख फहीम व त्यांचे मोठे बंधू शेख वसीम हुसैन हे दोघे कार घेऊन घराकडे जाण्यासाठी निघाले होते. वीटभट्टीवरून काही अंतर पुढे गेल्यानंतर सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास कारच्या बोनेटमधून अचानक धूर निघत असल्यामुळे कारचालक शेख फहीम यांनी कार थांबविली. यानंतर दोघेही भाऊ कारमधून उतरून बोनेटची पाहणी करीत असताना अचानक गाडीने पेट घेतला. त्यामुळे या दोघा भावंडांनी मदतीसाठी आरडा-ओरड केली असता गावातील नागरिक व रस्त्याने ये-जा करणार्या वाहनधारकांनी या कारकडे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.
आगीत कार झाली भस्मसात
या कारच्या बोनेटमधून धूर निघाल्यानंतर अवघ्या काही क्षणातच कारला आग लागल्यामुळे शेख फहीम व शेख वसीम हे दोघे घाबरून गेले. आग विझविण्यासाठी जवळपास पाणी नसल्यामुळे या आगीची माहिती वाळूज अग्निशामक विभागाला देऊन आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. ही माहिती मिळताच अग्निशामक अधिकारी के.ए. डोंगरे, बी.एन. राठोड, एस.एस. राठोड, आर.ए. चौधरी, आर.एस. फुलारे, ए.ए. चौधरी, ए.जे. गोसावी आदींनी घटनास्थळ गाठून उपसरपंच शेख युसूफ, सय्यद अलीम, शेख अफसर, शेख अन्वर, शेख जमीर, हाजी मुसा पटेल, नईम शेख, वसीम शेख, कलंदर शेख, राजू शेख आदींच्या मदतीने आग विझविली. मात्र आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत कार पूर्णत: भस्मसात होऊन तिचा केवळ सांगाडा उरला होता.
प्रसांगवधान राखून थांबविली कार
साजापूरच्या वीटभट्टीवरून निघताच कारच्या बोनेटमधून अचानक प्रचंड धूर निघत असल्यामुळे शेख फहीम व शेख वसीम या दोघांनी प्रसांगवधान राखत कार थांबवून कारच्या बाहेर पडले. कार विझविण्याचा प्रयत्न करीत असताना आग आणखी भडकून या कारचा कोळसा झाला. नशीब बलवत्तर असल्यामुळे दोघेही भावंडे बचावली आहेत. या घटनेत जवळपास ७ ते ८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज कारमालक शेख फहीम यांनी वर्तविला आहे.