औरंगाबादेत बर्निंग कारचा थरार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:13 AM2018-04-13T00:13:22+5:302018-04-13T00:16:56+5:30
वाळूज एमआयडीसीतून शहराकडे जाणाऱ्या कारला आज गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास छावणी उड्डाणपुलावर अचानक आग लागली होती. या धावत्या कारला आग लागताच या रस्त्यावरून ये-जा करणा-या वाहनधारकांनी आरडाओरड केल्यामुळे कारचालकाने कार थांबविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतून शहराकडे जाणाऱ्या कारला आज गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास छावणी उड्डाणपुलावर अचानक आग लागली होती. या धावत्या कारला आग लागताच या रस्त्यावरून ये-जा करणा-या वाहनधारकांनी आरडाओरड केल्यामुळे कारचालकाने कार थांबविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
याविषयी अधिक माहिती अशी की, व्ही. ए. अवसरमल व त्यांचे दोन मित्र हे कार क्रमांक एम.एच.२०, बी.एन.४९८४ मध्ये बसून आज गुरुवारी दुपारी वाळूज एमआयडीसीतून शहराकडे चालले होते. औरंगाबाद-नगर महामार्गावरून शहराकडे जात असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास छावणी उड्डाण पुलावर या कारच्या खालून आगीच्या ज्वाला निघत असल्याचे या महामार्गावरून ये-जा करणाºया वाहनधारकांना दिसून आले. या उड्डाण पुलावर चढ असल्याने तसेच वाहनांची वर्दळ असल्यामुळे कारचा वेग कमी असल्यामुळे वाहनधारकांनी आरडाओरड केल्याने कारचालक व्ही. ए. अवसरमल यांनी कार थांबवली. कार थांबताच कारच्या बोनेटमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्यामुळे घाबरलेल्या कारमधील तिघांनी बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबले. क्षणार्धात यानंतर कारने पेट घेतल्यामुळे या महामार्गावरील वाहने जागच्या जागीच थांबली होती. कारला आग लागल्यामुळे कुणीतरी अग्निशामक विभागाशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान, या ठिकाणी जवळच असलेल्या लष्करी जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजूने जाणारी वाहने अडवून ठेवत कारला लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळातच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून कारवर पाण्याचा मारा करून आग विझविली.
वाहनधारकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
वाळूजकडून शहराकडे ही कार जात असताना या कारच्या समोरील भागातून आगीच्या ज्वाला बाहेर पडत असल्याचे या महामार्गावरून ये-जा करणाºया वाहनधारकांना दिसून आले होते. छावणी उड्डाण पुलावर कारचा वेग कमी असल्यामुळे वाहनधारकांनी आरडाओरड करून कारचालकास कार थांबविण्यास भाग पाडले. कारमधून तिघे प्रवासी उतरताच कारने पेट घेतला. नशीब बलवत्तर असल्याने तसेच वाहनधारकांच्या सतर्कतेमुळे या कारमधील तिघेही प्रवासी बालंबाल बचावले. या आगीच्या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळ गाठून वाहनधारक, लष्करी जवान व अग्निशामक कर्मचाºयांच्या मदतीने कारला लागलेली आग विझविण्यास मोलाची भूमिका पार पाडली.