जाळून पत्नीचा खून करणा-यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:40 AM2017-12-27T00:40:55+5:302017-12-27T00:40:58+5:30
किरकोळ कारणावरून पत्नी मनीषा (२६) चा जाळून खून केल्याच्या आरोपाखाली तिचा पती राधेश्याम सुधाकर गजभार (३६) राहणार विष्णूनगर, औरंगाबाद याला सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : किरकोळ कारणावरून पत्नी मनीषा (२६) चा जाळून खून केल्याच्या आरोपाखाली तिचा पती राधेश्याम सुधाकर गजभार (३६) राहणार विष्णूनगर, औरंगाबाद याला सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.
आरोपीचे मनीषासोबत २००३ ला लग्न झाले होते. मनीषा मोलमजुरी करीत होती. राधेश्यामला दारूचे व्यसन होते. प्लॉट खरेदी करण्यासाठी मनीषाने तिच्या माहेराहून एक लाख रुपये आणावेत या मागणीसाठी राधेश्याम मनीषाचा वारंवार शारीरिक, मानसिक छळ करीत असे, २२ फेब्रुवारी २०१३ रोजी ‘आत्या येणार आहे. चांगला स्वयंपाक तयार कर’ असे राधेश्याम घरातून बाहेर जात असताना पत्नीला म्हणाला. घरात रॉकेल नाही, असे पत्नीने उत्तर दिल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. संध्याकाळी राधेश्याम रॉकेल घेऊन आला. त्यानंतर त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला असता राधेश्यामने तिला मारहाण केली आणि आणलेले रॉकेल पत्नी मनीषाच्या अंगावर ओतले व तिला पेटवून दिले. यात मनीषा ५७ टक्के भाजली होती. सासूने तिला दवाखान्यात दाखल केले. त्यावेळी स्टोव्हच्या भडक्याने भाजल्याचा जबाब मनीषाने पोलिसांना दिला होता. तो जबाब सासू आणि दिराच्या दबावाखाली दिला असल्याचे तिने पोलिसांना नंतर सांगितले होते. तिने कार्यकारी दंडाधिकाºयांसमोर दिलेल्या मृत्युपूर्व जबाबात मात्र, पतीने वरीलप्रमाणे रॉकेल टाकून जाळल्याचा जबाब दिला होता.
राधेश्यामविरुद्ध सुरुवातीस भा.दं.वि. कलम ३०७ आणि ३२३ नुसार जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान १७ मार्च २०१३ रोजी मनीषाचे निधन झाले. त्यानंतर राधेश्यामविरुद्ध कलम ३०२ वाढविण्यात आले. तपासाअंती पोलीस अधिकारी शेख माजीद यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी अभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी ८ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यांच्यापैकी डॉक्टर, कार्यकारी दंडाधिकारी आणि मयताचे वडील रामभाऊ शिंदे यांचे जबाब महत्त्वाचे ठरले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी राधेश्यामला पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली भा.दं.वि. कलम ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला सहा महिने जादा सश्रम कारावास भोगावा लागे, असे आदेशात म्हटले आहे.