कंटेनरवर बस धडकून ६ प्रवासी जखमी; तर अपघात पाहताना ४ कार एकमेकांवर आदळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 01:50 PM2024-12-06T13:50:03+5:302024-12-06T13:51:01+5:30
हा अपघात पाहण्यास थांबल्याने चार कार एकमेकांवर आदळल्याने पुन्हा एक अपघात होऊन चारही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
- श्रीकांत पोफळे
करमाड:जालना महामार्गावर सटाणा पाटीवर उभ्या कंटेनरला बसने मागून धडक दिल्याची घटना आज सकाळी ७. ३० वाजता घडली. अपघातात बसमधील महिला वाहक आणि ६ प्रवासी जखमी आहेत. यातील एक प्रवासी बाजीगर अशोक गायकवाड (२५, रा. शहा नगर, छत्रपती संभाजीनगर) हा गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, हा अपघात पाहण्यास थांबल्याने चार कार एकमेकांवर आदळल्याने पुन्हा एक अपघात होऊन चारही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
आज पहाटे पासून अवकाळी पाऊस पडून सर्वत्र धुके पसरलेले असल्याने अंधुक प्रकाश होता. छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावर असलेल्या सटाणा पाटीवर जालन्याच्या दिशेला जाणाऱ्या बाजूने एक कंटेनर (MH20DE9783) उभा होता. या उभ्या कंटेनवर जालनाकडे जाणारी सिडको आगाराची बस (MH20BL3035) पाठीमागून धडकली. यावेळी बसमध्ये चालक गंगाधर उत्तम मोरे आणि १५ प्रवासी होते. महिला बस वाहकासह ६ प्रवासी जखमी झाले आहेत. धडक इतकी जोरदार होती की सटाणा गावापर्यंत या अपघाताचा आवाज पसरला. आवाज ऐकून सटाणा गावच्या तरुणांनी अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना बसमधून बाहेर काढून वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिकेत रवाना केले. या अपघातात बसच्या समोरची डावी बाजू पूर्णपणे चकनाचूर झाली.
अपघातात जखमी:
अशोक गायकवाड (वय २५), प्रिया अशोक गायकवाड ( वय ३५), जिजाबाई अशोक गायकवाड ( ५०) सर्व रा. शहा नगर, छत्रपती संभाजीनगर, हमीद अब्दुल चाऊस ( ३२), समीर हमीद चाऊस ( २०) दोघे रा. हर्सूल, छत्रपती संभाजीनगर, व महिला वाहक सोनाली बागडे (३५) असे ६ प्रवासी जखमी आहेत.
अपघात पाहताना ४ कार एकमेकांवर धडकल्या
रस्त्यावरील कंटेनर-बसचा अपघात पाहण्यासाठी एका कारणे गती कमी केली. यामुळे पाठीमागून आलेल्या ४ कार देखील एकमेकांना धडकल्या. सुदैवाने यात कोणाला इजा झाली नाही. त्यानंतर दोन कार घटनास्थळावरून निघून गेल्या. तर दोन कार घटनास्थळी उभ्या होत्या.