मंत्र्यांच्या तंबीनंतरही धावतात गळक्या बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 06:42 PM2019-07-22T18:42:32+5:302019-07-22T18:44:02+5:30
अधिकाऱ्यांना फिरविणार का?
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : गळकी एसटी दिसल्यास त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्याच एसटीतून फेरफटका मारला जाईल, अशी तंबी परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे. मात्र, ही तंबी अधिकाऱ्यांनी फारशी गांभीर्याने घेतलेली नसून, जिल्ह्यातील रस्त्यांवर सर्रास गळक्या ‘बस’ धावताना दिसत आहेत. त्यामुळे गळक्या बसमधून अधिकाऱ्यांना खरेच फिरवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच एसटी महामंडळाच्या गळक्या बसची दुरुस्ती करण्यात यावी, असे आदेश एप्रिल २०१९ मध्ये एसटी महामंडळाने दिले होते. त्यानंतर पुण्यात आषाढी एकादशीनिमित्त जादा बसविषयी ‘एसटी’ची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी गळक्या एसटीबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितला. एकही एसटी गळकी नसल्याचे अधिकाऱ्यांकडून बैठकीत सांगण्यात आले. त्यानंतर ‘एसटी‘च्या बऱ्याच बसगाड्या गळक्या असल्याचे निदर्शनास आले आणि त्याच्या तक्रारी दिवाकर रावते यांच्यापर्यंत पोहोचल्या. मंत्री रावते यांनी गळकी एसटी दिसल्यास त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्याच ‘एसटी’तून फेरफटका मारला जाईल, अशी तंबी दिली. त्यामुळे किमान यानंतर तरी गळक्या बसची दुरुस्ती गांभीर्याने केली जाईल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे; परंतु अद्यापही गळक्या बस रस्त्यावर धावत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.
बैठकीकडे लक्ष
एसटी महामंडळाची त्रैमासिक बैठक सोमवारी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या उपस्थितीत शहरात होत आहे. यापूर्वी आॅक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या बैठकीप्रसंगी बस जीपीएसप्रणाली आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून मार्च २०१९ पर्यंत १०० टक्के आॅनलाईन होतील, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात ही प्रणाली रेंगाळली आहे. शिवाय गळक्या बससह अनेक प्रश्न आहेत. या सगळ्यांवर बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.
जाफराबाद-औरंगाबाद बस
जाफराबादहून सिडको बसस्थानकात शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास येणाऱ्या लाल बसमधून येणाऱ्या प्रवाशांवर प्रवासादरम्यान भिजण्याची वेळ आली. ही बस गळत होती. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. जाफराबादहून येणाऱ्या अनेक बस गळत असल्याचा अनुभव प्रवाशांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
परिवहनमंत्री म्हणाले...
यासंदर्भात परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधण्यात आला. गळक्या बससंदर्भात प्रवाशांच्या तक्रारीविषयी त्यांना माहिती देण्यात आली असता या प्रश्नाकडे अधिकारी लक्ष देतील, असे ते म्हणाले.